Belagavi

काळ्या दिनी शिवसेनेच्या वाघांची बेळगावात घुमणार डरकाळी !

Share

कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी पुन्हा एकदा कर्नाटकाला आणि केंद्र सरकारला प्रखर मराठी बाणा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. यातूनच 1 नोव्हेंबरला बेळगावात शिवसेनेच्या वाघांची डरकाळी घुमणार आहे. हाती भगवा ध्वज आणि मशाल घेऊन शिवसैनिक बेळगावात प्रवेश करून सायकल रॅलीत भाग घेणार आहेत.

होय, बेळगावमध्ये यंदा कर्नाटक राज्योत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. त्याचदिवशी बेळगावसह सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करावा, अशी मागणी करून काळा दिन पाळण्यात येणार आहे. काळे कपडे घालून आणि डोक्याला व हाताला काळ्या पट्ट्या बांधून सायकल फेरी काढण्यात येणार आहे. या काळ्या दिनाचा फेरीत महाराष्ट्रातील कोल्हापूरचे शिवसेनेचे नेते सहभागी होणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने म. ए. समितीच्या काळ्यादिनाला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांनी 1 नोव्हेंबरला बेळगावात येणार असल्याची घोषणा केली आहे. काल कोल्हापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीनंतर “बेळगाव, कारवार, हल्याळ, निपाणी, बिदर, भालकी, औरादसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सांगितले की, 1 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळा दिन कार्यक्रमाला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. त्यानुसार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी 31 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे जातील. आधी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ ते एकत्र जमतील. त्यानंतर कोल्हापूर, कागल, निपाणी, संकेश्वर मार्गे बेळगावला जाणार आहेत. तसेच बेळगावातील समितीचे नेते 31 ऑक्टोबरला कोल्हापुरात येणार आहेत. बेळगावपर्यंत ते आमच्यासोबत रॅली काढतील. हातात भगवा झेंडा आणि मशाल घेऊन समिती नेते-कार्यकर्ते आणि शिवसैनिक बेळगावला जाणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी बेळगावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करतील. नंतर 1 नोव्हेंबरला काळ्या दिन कार्यक्रमात सहभाग घेतील. कागल सीमेवर अडवल्यास आम्ही शिनोळीमार्गे बेळगावला जाऊ, असे सांगत शिवसेना नेते विजय देवणे यांनी कर्नाटक सरकारला खुले आव्हान दिले आहे. बाइट
व्हॉइस : दरम्यान, मराठी सीमावासियांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने स्थापनेपासूनच सीमावासीयांना नेहमी साथ दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हीच परंपरा जोपासत आता कोल्हापूरच्या शिवसेनेच्या वाघांनी बेळगावात प्रत्यक्ष येऊन काळ्यादिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या डरकाळीने कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले असून त्यांची वळवळ सुरु झाली आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला दरवर्षी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस साजरा करू देऊ नये, अशी विनंती कन्नड कार्यकर्त्यांनी सरकारकडे केली आहे.

Tags:

kolhapur shivsena mashal rally on 1 november in belgaum black day