बेळगावचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविण्यात यावे, यासाठी खेळाडूंना आर्थिक तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी दिले.
काकती येथील संभाजी परमोजी या कुस्तीपटूची नागालँड येथील कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवडीनिमित्त आयोजिण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राहुल जारकीहोळी यांनी संभाजी परमोजी यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वप्नील राजू पाटील या राष्ट्रीय खेळाडूलाही १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याचप्रमाणे जयवंत निलजकर, अशोक पाटील आणि विनायक केसरकर या कुस्तीपटूंना प्रशिक्षण देणाऱ्या तीन कुशल तज्ज्ञांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहनधनाच्या स्वरूपात देण्यात आले.

यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून या सुविधांचा लाभ घेत प्रत्येकाने बेळगावचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन राहुल जारकीहोळी यांनी केले. गरीब मुले आणि महिला यांच्यातील कला आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
आयएएस-आयपीएस शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कार्य सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून होत असून याअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी उच्च पातळीवर यश मिळविले असून काकती येथील मुलांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मलगौडा पाटील यांनी केले.
यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, अरुण कटांबळे, भाजपचे माजी उपाध्यक्ष आ. सिद्धगौडा सुनगार, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सागर पिंगट, एपीएमसी माजी सदस्य बाबुराव पिंगट, ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील सुनगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडी, सदस्य सिद्दू मुचंडी, प्रवीण रेडेकर, काकती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सिद्दप्पा टुमरी, रामण्णा गुळी, सागर पिंगट, कल्लाप्पा कडोलकर, कल्लाप्पा पाटील, दयानंद भरमाप्पा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments