Belagavi

हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधला घेराव : कर्नाटक मराठा फेडरेशनचा सरकारला इशारा

Share

कर्नाटक सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच अन्य विविध मागण्या संदर्भात सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र या मागण्यांकडे विद्यमान भाजप कर्नाटक सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या हितासाठी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारला जाग आणण्यासाठी सुवर्णसौधला घेराव घालण्याचा निर्णय कर्नाटक राज्य मराठा क्षत्रिय फेडरेशनने घेतला आहे, अशी माहिती फेडरेशनचे राज्य अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी दिली.

बेळगावात आज उत्तर कर्नाटकातील मराठा फेडरेशन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना श्यामसुंदर गायकवाड म्हणाले, विद्यमान कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र समाजाच्या महत्त्वपूर्ण अशा आरक्षण मागणीसह राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या बारा मतदारसंघात समाजातील प्रतिनिधींना उमेदवारी दिली जावी. त्याचबरोबर दोन खासदार, दोन विधान परिषद सदस्यांची घोषणा करावी. या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील समस्त मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे.

भारतीय जनता पक्षाने नेहमीच आपल्या राजकीय हितासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला आहे. मात्र मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. आमदार श्रीमंत पाटील यांच्याकडील मंत्रीपद काढून घेऊन, विद्यमान सरकारने मराठा समाजाची अवहेलना केली आहे. याउलट काँग्रेसच्या सत्ताकाळात मराठा समाजातील आमदारांना मंत्रीपदाबरोबरच अन्य महत्त्वाची पदेही देण्यात आली होती. मराठा समाजात पसरलेल्या अस्वस्थतेकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे लक्ष आहे, याची जाणीव विद्यमान भाजप सरकारने ठेवावी.

भाजप सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुवर्णसौधला घेराव घालण्यात येईल. या आंदोलनात उत्तर कर्नाटकातील वीस ते पंचवीस हजार मराठा समाज बांधव सहभागी होतील. असा इशाराही श्यामसुंदर गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला.

या बैठकीला उपस्थित फेडरेशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार मनोहर कडोलकर, मोहन जाधव, भाऊसाहेब जाधव, सुमित्रा उघळे, विनय कदम, यांनीही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेताना सरकारला जाग आणण्यासाठी सुवर्णसौधला घेराव घालण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या बैठकीला मंगला काशीलकर, चिकोडीचे अध्यक्ष अनिल माने, भाऊसाहेब शिंगटे, विठ्ठल वाघमोडे, रमेश तहसीलदार, महेश रेडेकर, राहुल भातकांडे, बसू लाड, गणपत पाटील यांच्यासह मराठा समाज प्राधिकरणाचे संचालक अनंतराव घोरपडे तसेच अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.

Tags:

kshtriy-maratha-samaj-2-a-reservation-shyamsundhar-gaikwad/