बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावचे रहिवासी आणि मलप्रभा-मुंगेत्री परिसर पारायण मंडळ-किणयेचे अध्यक्ष ह. भ. प. ईश्वर गुंडू कर्लेकर यांचे आज, गुरुवारी पहाटे ४ वाजता निधन झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, सजवलेल्या ट्रॅक्टरवरून त्यांनी अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मलप्रभा-मुंगेत्री परिसर पारायण मंडळ-किणयेचे अध्यक्ष ह. भ. प. ईश्वर गुंडू कर्लेकर यांचे आज पहाटे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. विठुरायाच्या सेवेत आयुष्य व्यतीत करत समाजाचे प्रबोधन केलेले हभप ईश्वर कर्लेकर हे मलप्रभा-मुंगेत्री परिसर पारायण मंडळ-किणये, धान्य सोसायटी, संतीबस्तवाडचे ३५ वर्षे अध्यक्ष होते. गावातील केएमएफ दूध डेअरीचे चेअरमन म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले होते. ग्राम पंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे चांगले काम केले होते. गावातील दत्त मंदिर उभारणीत त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे-सुना, मुली-जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

राहत्या घरापासून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कर्लेकर यांची फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात भजने गात वारकऱ्यांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण संतीबस्तवाड गाव आणि परिसरातील वारकरी, नागरिक सहभागी झाले होते.
त्यानंतर गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे असे कुटूंबियांनी कळविले आहे.


Recent Comments