Vijayapura

नागठाण येथे जल्लोषपूर्ण वातावरणात महालिंगराया यात्रा

Share

महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. या यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील भाविकांनी देखील उत्साहाने सहभाग घेऊन हा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.

विजापूरमधील नागठाण या गावात असलेल्या बिरसिद्धेश्वर यात्रोत्सवाला ऐतिहासिक महत्व आहे. या यात्रोत्सवासाठी विजापूरसह कर्नाटकातील विविध भागातील भाविक याचप्रमाणे महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील भाविक देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान आयोजिण्यात येणाऱ्या या यात्रोत्सवात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण परिसर भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन निघाला होता. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या देवस्थानात आयोजिण्यात येणाऱ्या यात्रोत्सवात श्री बिरदेवाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. या देवस्थानात हिंदू धर्मियांसह मुस्लिम धर्मीय देखील उत्साहाने सहभाग घेतात. हे देवस्थान देखील इंडो-इस्लामिक शैलीत उभारण्यात आले आहे. गावातील प्रत्येक जाती धर्माचे लोक या देवस्थानाचा जागर करतात. धनगर समाजाचे देवस्थान असलेल्या श्री बिरदेव देवस्थानात प्रत्येक जाती धर्माच्या भाविकांनाही समान वागणूक देत सर्व प्रथा रितीरिवाजाप्रमाणे पार पाडल्या जातात, हे या देवस्थानाचे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाचे महालिंगराय देवस्थान आणि या देवस्थानात साजरी केली जाणारी यात्रा, या पार्श्वभूमीवर विजापूरमध्ये देखील श्री बिरदेव यात्रोत्सव साजरा केला जातो, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.  नागठाण गावात साजऱ्या होणाऱ्या या यात्रोत्सवात सर्वधर्मसमभावनेचा संदेश देत मोठ्या उत्साहात हि यात्रा पार पाडली जाते. या सोहळ्यासाठी कर्नाटकसह आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या भागातून धनगर व इतर समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

Tags: