Ramanagara

मुदेनूर उलटी-जुलाब रुग्णांची संख्या 94 वर, मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची भरपाई

Share

रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडलेल्यांची संख्या 94 झाली आहे. तसेच गंभीर अत्यवस्थ असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याची पाईप फुटून पाणी दूषित झाले. हे दूषित पाणी प्यायल्याने अत्यवस्थ झालेले 70 वर्षीय शिवप्पा यांचा उपचारांचा उपयोग न होता, मृत्यू झाला. शिवप्पा हे दूषित पाणी प्याल्यानंतर अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारांसाठी रामदुर्ग तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांचा सकारात्मक परिणाम न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने शिवाप्पा यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मुदेनूरमध्ये उलटी-जुलाबामुळे गेल्या 4 दिवसांत एकूण 94 लोक आजारी पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईप तुटून सांडपाणी मिश्रित पाण्याचा पुरवठा गावात झाला होता. तेच पाणी प्याल्याचा अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. परिणामी 44 पुरुष, 30 महिला, 12 मुले, 8 मुली आजारी आहेत. उलट्या आणि जुलाबाचा त्रास अनेकांना होतो. चौघांना गंभीर अवस्थेत बागलकोट जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुदेनूर ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाच्या बेजबाबदारपणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

दूषित पाणी पिल्याने शिवाप्पा बेल्लेरी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे. रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून, शुद्ध करून प्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags:

mudenoor-94-patients-admitted/