Belagavi

महाद्वार रोडवरील स्पेअरपार्टस दुकानाला आग; सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान

Share

शॉर्ट सर्किटने स्पेअरपार्टस दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान भस्मसात झाल्याची दुर्घटना बेळगावात घडली आहे. या आगीत सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे दुचाकी वाहनांचे स्पेअरपार्टस जळून खाक झाल्याचा अंदाज आहे.

महाद्वार रोड मेन येथील कॅनरा बॅंकेसमोरील अरिहंत बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील जेमिनी डिस्ट्रिब्युटर्स या स्पेअर पार्ट दुकानाला ही आग लागली. जेमिनी डिस्ट्रिब्युटर्स हे बॉश टू व्हीलर्स स्पेअर पार्टसचे अधिकृत वितरक आहेत. सनत जगवले यांच्या मालकीचे हे दुकान आहे.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास दुकानमालक व कामगार दिवाळी लक्ष्मी पूजन करून घरी जात असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले. दुकानातील दुचाकींचे सुटे भाग पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

या दुर्घटनेबद्दल आमच्या इनन्यूज-आपली मराठीसोबत बोलताना, जेमिनी डिस्ट्रीब्युटर्स या दुचाकी स्पेअर पार्ट्सच्या दुकानाच्या मालक शैलश्री सनथ जगवाले यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आमच्या दुकानाला आग लागली. यामध्ये सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुकानात काहीच शिल्लक उरलेले नाही. काही उरले असेल तरीही ते निरुपयोगी आहे. काल सकाळी आम्ही दिवाळीनिमित्त दुकानात लक्ष्मी पूजा केली.  दिवा विझेपर्यंत आम्ही इथेच थांबलो आणि मग दुकानाला कुलूप लावून घरी गेलो. त्यानंतर ही दुर्घटना घडली, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर सेल्समन बसवराज यांनी सांगितले की, काल पूजा आटोपल्यानंतर आम्ही दिवा विझवला आणि निघालो. दुपारी 12.30 च्या सुमारास शेजाऱ्यांनी फोन करून तुमच्या दुकानातून धूर येत आहे असे सांगितले. लागलीच आम्ही दुकानात धाव घेतली. परंतु तोपर्यंत सर्व काही जळून वितळले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग विझवली.

दरम्यान, या घटनेची नोंद मार्केट पोलीस ठाण्यात झाली आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आगीच्या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने दुकानमालक अत्यंत चिंतेत असल्याचे यावेळी दिसून आले.

Tags:

Bike accessories shop short circuit