कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २०२२ च्या कित्तूर उत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते होणार आहे. तसेच सुमारे १५ मंत्रीही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात २४ ऑक्टोबर हा दिवस महिलांसाठी राखून ठेवला आहे. यावेळी महिला संमेलन, महिला कविसंमेलन, महिलांसाठी क्रीडा व इतर उपक्रम घेण्यात येणार आहेत.त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात तीन दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होणार आहेत. या उत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जलक्रीडा, फळ प्रदर्शन, विविध प्रकारचे ११५ स्टॉल्स, मॅरेथॉन, ओपन व्हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, सायकलिंग यासारख्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या असून पहिल्यांदाच ‘डॉग शो’ देखील आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तीन दिवस या उत्सवात प्रसादाच्या स्वरूपात जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली असून जनतेने मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होऊन कित्तूर महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments