Belagavi

बेळगावमध्ये पीएम किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन

Share

देशभरात ६०० ठिकाणी किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन आज पार पडले असून आज दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने या केंद्रांचे उद्घाटन केले. याचप्रमाणे किसान सन्मान योजने अंतर्गत १२ व्या योजना निधीचा हप्ता जाहीर केला.

व्हॉइस : देशभरात विविध ६०० ठिकाणी स्थापन झालेल्या केंद्रांमध्ये बेळगावच्या केंद्राचाही समावेश असून सोमवारी बेळगावमधील किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडले. ‘एक देश एक खत’ या नावे भारतात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके खते देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या १२ व्या टप्यातील निधीच्या माध्यमातून १६ हजार कोटी रुपये सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून बेळगावमधील एस डी कलमनी, मार्केट यार्ड येथे कृषी विभागातर्फे आयोजित पीएम किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन तसेच कृषी परिसंवाद कार्यक्रमाचे उदघाटन खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार मंगल अंगडी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यापैकी किसान समृद्धी केंद्र हाही विशेष प्रकल्प आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील ५ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना १०७ कोटी रुपये देण्यात आले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १२ वा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून ही योजना १ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील ५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना १५८७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम थेट जमा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

ज्याप्रमाणे एक जिल्हा एक उत्पादन आहे त्याच धर्तीवर एक देश एक खत हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. खतांची दुकाने ही केवळ खतांइतकीच मर्यादित न राहता शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्वसमावेशक माहिती येथे उपलब्ध व्हावी, हे पंतप्रधानांचे स्वप्न असल्याचे शिवनगौडा पाटील म्हणाले.

या कार्यक्रमात हुबळी येथील पीपीएल सहव्यवस्थापक गणेश हेगडे, कृषी तज्ञा डॉ. बी जी विश्वनाथ, प्रगतशील शेतकरी रेईदास नारायण, शांतीनाथ कलमनी, एस बी कोंगवाड, नगरसेवक रेशमा पाटील, संदीप जिरग्याळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

belgaum-pm-kisan-program/