राज्यातील जनतेचा कल भाजपकडे आहे. त्यातही येडियुरप्पा आणि रमेश जारकीहोळी यांच्यामुळे येत्या निवडणुकीत पक्ष 150 जागा सहज जिंकेल असा दावा करतानाच रमेश जारकीहोळी यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येईल असे संकेत भापचे कर्नाटक प्रभारी अरुणसिंह यांनी दिलेत.
बेळगावात सर्किट हाऊसमध्ये आज रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अरुणसिंह म्हणाले, येडियुरप्पा हे भाजपचे कर्नाटकातील एक तुल्यबळ नेते आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत. त्यांचे प्रयत्न तसेच लोकांचा कल यामुळे 2023च्या निवडणुकीत भाजप 150 जागा सहज जिंकेल असा दावा त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यात रमेश जारकीहोळी यांची मोठी भूमिका राहिले असे सांगतानाच यासाठी त्यांना पक्षात लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येईल असे संकेत अरुणसिंह यांनी दिले. रमेश जारकीहोळी यांचे बेळगाव जिल्ह्यात आणि राज्यातही चांगले वजन आहे. भाजपला निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष बनविण्यात ते महत्वाचे योगदान देतील असेही त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा भाजपात कसलेच मतभेद नाहीत, जे काही मतभेद आहेत ते काँग्रेसमध्येच आहेत असा दावा अरुणसिंह यांनी केला.


Recent Comments