बेळगावातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र मानले जाणाऱ्या श्री कपिलेश्वर देवस्थानला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज भेट देऊन कपिलनाथांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बेळगाव आणि गोव्यात पूर्वीपासून असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.
केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज बेळगावचा दौरा केला. यावेळी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी बेळगावचे पुरातन तीर्थक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानला भेट देऊन कपिलनाथांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टकडून त्यांचे भगवा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. दत्त पीठाचे अशोक शर्मा गुरुजी यांच्याहस्ते शाल घालून, फळफळावळे, श्रीफळ देऊन डॉ. सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
देवस्थानात दर्शन घेऊन पाहणी केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, बेळगाव आणि गोव्यात पूर्वीपासून असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. गोवा आणि बेळगावचे प्राचीन काळापासून सौहार्दाचे संबंध आहेत. दोन्ही ठिकाणचा व्यापार-उदीम नीट चालण्यासाठी गोवा सरकार योग्य ती पावले उचलेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, नगरसेवक राजू भातकांडे, ट्रस्टी राकेश कलघटगी, अभिजित चव्हाण, विवेक पाटील, सतीश निलजकर, दौलत जाधव, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सरचिटणीस किरण जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments