award

आयर्नमॅन सीपीआय श्रीशैल ब्याकोड : डीजीपींनी केले आयर्नमॅनचे कौतुक

Share

पोलीस विभागाचे काम हे अत्यंत धकाधकीचे मानले जाते. अत्यंत व्यस्त कामातून देखील आपल्या समाजासाठी आदर्शवत काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांनीही अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आपल्या व्यस्त कामातून घटप्रभा पोलीस ठाण्याच्या एका सीपीआयने समाजासाठी आदर्श म्हणून काम केले आहे. पोलीस विभागाचे डीजीपी प्रवीण सूद, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अलोककुमार यांनी सदर सीपीआयच्या कामगिरीबाबत ट्विट करून कौतुकही केले आहे…

दणकट शरीरयष्टी आणि ताडमाड उंची, पोलिसी वर्दीला शोभणारा हा आयर्नमॅन आहे, घटप्रभा पोलीस स्थानकात सीपीआयपदी कार्यरत असणारा श्रीशैल ब्याकोड! गेल्या दोन वर्षांपासून घटप्रभा पोलीस स्थानकात सीपीआय म्हणून काम करणारे श्रीशैल ब्याकोड हे बागलकोट जिल्ह्यातील आहेत. रबकवी बनहट्टी तालुकयातील चिम्मड या गावात सध्या वास्तव्यास असणारे ब्याकोड हे गेल्या १५ वर्षांपासून पोलीस विभागात आपल्या विशेष शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत आपल्या पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अलीकडेच कोल्हापूर मध्ये झालेल्या ट्रायथलॉन म्हणजेच पोहणे, सायकलिंग करणे आणि धावणे या तिन्ही खेळात त्यांनी हाफ आयरन मॅन म्हणून यश मिळविले आहे.

पेशाने पोलीस परंतु उत्साहाने भारलेल्या या तरुण सीपीआय यांची ओळख आयर्नमॅन अशी झाली आहे. अत्यंत उत्साही असलेले सीपीआय श्रीशैल ब्याकोड यांना आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते यामागे मुरूगीश चेन्नान्नावर यांचेही परिश्रम आहेत. मुरुगेश यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे गेल्या वर्षभरात ब्याकोड यांनी वर्कआउट केले. टेनिस, हाफ मॅरेथॉन सारख्या अनेक क्रीडाप्रकारात त्यांनी यश मिळविले. या कार्यासाठी ब्याकोड यांना त्यांच्या पत्नीचेही सहकारी मिळत आहे. दैनंदिन आहार आणि आपल्या या कामासाठी पत्नीची मिळत असलेली साथ याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहकाऱ्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे आपण हे साध्य करू शकलो असे ब्याकोड सांगतात. पुढील वर्षी कझाकस्तानमध्ये फुल आयर्न मॅन स्पर्धा आहे.त्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळेल आणि फुल आयर्न मॅन म्हणून आपण यश मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाने आयर्नमॅन बनलेल्या श्रीशैल ब्याकोड यांचे उदाहरण हे इतरांसाठीही आदर्शवत असे आहे. पोलीस विभागातील कार्य करत कर्नाटकचे नाव उंचावणाऱ्या या तरुण सीपीआयचे खुद्द डीजीपींनीही कौतुक केले आहे.

Tags:

ghataprabha-cpi-iron-man-title/