श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना ट्रस्ट खासबाग विभागाच्या वतीने बेळगावात आज वडगाव विभागस्तरीय सामूहिक श्री सत्यनारायण पूजा, पद्ग्रहण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बेळगावातील वडगाव येथील दुर्गादेवी देवस्थानच्या सभागृहात आज, शुक्रवारी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना ट्रस्टच्या वतीने वडगाव विभागस्तरीय सामूहिक श्री सत्यनारायण पूजा, पद्ग्रहण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अवरोळ्ळीचे चन्नबसव स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर खा. मंगल अंगडी, बेळगाव दक्षिणचे आ.

अभय पाटील, श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना ट्रस्टचे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शेकडो दांपत्यांनी सामूहिक सत्यनारायण पूजेत श्रद्धा-भक्तीने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना खासदार मंगल अंगडी म्हणाल्या, श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजना संघाने महिलांच्या सबलीकरणासाठी मोठे विधायक कार्य केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी या संघाने विविध योजना राबवून महिलांच्या आयुष्यात प्रकाशवाट आणली आहे. सदस्य महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण होण्यासह संघालाही सशक्त करावे असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर बोलताना बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले, अन्य विकसित देशांप्रमाणेच आपला भारत देशही विकसित, स्वयंपूर्ण व्हावा या हेतूने धर्मस्थळचे धर्माधिकारी पूज्य वीरेंद्र हेग्गडे यांनी धर्मस्थळ संघाच्या माध्यमातून अलौकिक कार्य केले आहे. माझा देश, माझे लोक यांचे कल्याण व्हावे या हेतूने निरपेक्ष भावनेने त्यांनी केलेले काम जगात आणि देशात आदर्श आहे. ते पाहूनच पंतप्रधान मोदींनी त्यांची राज्यसभेवर निवड केली. त्यांच्या निवडीमुळे राज्यसभेचा गौरवही वाढला आहे. देवाचे अधिष्ठान ठेवून काम करणाऱ्या या संघाच्या कार्याची पताका अशीच फडकत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
धर्मस्थळ संघाचे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. यावेळी मुलींनी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी संघाच्या महिला बचत गटांच्या असंख्य महिला आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Recent Comments