बेळगावातील जैन श्वेतांबर समाजाच्या दहा युवकांनी लौकिक जीवनाचा त्याग करत संन्यास मुनी दीक्षा स्वीकारली आहे. यानिमित्त आज बेळगावात त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

लौकिक जीवनाचा त्याग करत पारमार्थिक जीवनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्धार करून जैन श्वेतांबर समाजाच्या दहा युवकांनी संन्यास मुनी दीक्षा स्वीकारली आहे. यानिमित्त बेळगावातील पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिरापासून आज सकाळी त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सजवलेल्या अश्वरथात बसवून या युवकांची धार्मिक गीतांच्या साथीने शहरात मिरवणूक काढण्यात आली. पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिरापासून सुरु झालेली ही शोभायात्रा भेंडीबाजार, खडेबाजार, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ, मेणसी गल्ली या मार्गावरून फिरून पुन्हा पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिरापाशी तिची सांगता झाली.

यावेळी बोलताना श्वेतांबर जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या समाजाच्या ८ युवक आणि २ युवतींनी दीक्षा घेण्याचा मनोदय केला आहे. त्यांचा दीक्षा समारंभ येत्या जानेवारी महिन्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे. त्यानिमित्त आज दीक्षार्थींची बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. १२ ऑक्टोबरपासून १६ ऑक्टोबरपर्यंत पंचांदीका महोत्सव अनुष्ठान कार्यक्रम मुनिश्री ओंकारेश्वर आणि साध्वी श्रेयांस प्रकाशजी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात श्वेतांबर जैन समाजाच्या सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्वेतांबर जैन समाजाचे मुनिश्री तसेच राजकुमार खोडा यांच्यासह समाजबांधव, महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.


Recent Comments