बेळगावमध्ये कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाने मर्यादा घातल्या आहेत. मात्र कर्नाटकाचा राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करू दिला नाही तर येत्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना योग्य धडा शिकवू असा इशारा कन्नड आंदोलक संपतकुमार देसाई यांनी दिला.
१ नोव्हेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने राज्योत्सव मिरवणुकीत डॉल्बीवर बंदी आणली आहे. स्थानिक आमदारांनी राज्योत्सवात सक्रिय सहभाग न घेतल्याने कन्नड कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.यामुळे कन्नड संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून राज्योत्सव मिरवणुकीत डॉल्बी लावण्याची परवानगी द्यावी, तसेच स्थानिक आमदारांनी राज्योत्सव सोहळ्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली.

यावेळी बोलताना संपतकुमार देसाई म्हणाले, दरवर्षी डॉल्बी लावून राज्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त सांगितले जात आहे. डॉल्बी वापरावर मर्यादा घालण्यात आल्या असून वाहन जप्त करण्याचा इशाराही दिला आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फक्त बेळगावातील कर्नाटक राज्योत्सवापुरता मर्यादित आहे का..?
धारवाडमध्ये गणेशोत्सव, दांडिया, शिवजयंती, वाल्मिकी जयंती, ईद मिलाद कार्यक्रम भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक देखील तीन दिवस सुरु होती. विसर्जन मिरवणुकीत आमदारांनी मिरवणुकीची सांगता होईपर्यंत थांबून जबाबदारी पार पाडली मात्र राज्योत्सव मिरवणुकीसंदर्भात आमदारांचे मौन का? असा सवाल उपस्थित करत स्थानिक आमदारांवर नाराजी व्यक्त करत आगामी निवडणुकीत योग्य धडा शिकविण्याचा इशाराही दिला.
बेळगावमध्ये यंदा कर्नाटक राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी बेळगावच्या तीन आमदारांची आहे. जर राज्योत्सव धुमधडाक्यात साजरा करू दिला नाही तर आमदार अभय पाटील, अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असा इशारा दिला.
यावेळी विनायक बेळ्ळारी, अनिल दड्डीमनी, शिवू देवर आदी उपस्थित होते.


Recent Comments