Vijayapura

विजापुरात लंपी स्किनचा धोका बळावला !

Share

दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या विजापुरात शेतकऱ्यांसमोरील समस्यांचा पाढा संपता संपत नसून गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कोविड, अतिवृष्टी यासह विविध समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता लंपी स्किनचा धोका आवासून उभा आहे. जनावरांच्या त्वचेवरील हा रोग सध्या विजापुरात बळावला आहे.

विजापूर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किनचा आजार वाढला असून यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. महाराष्ट्र राज्यात या रोगाचा अधिक प्रभाव असून आता विजापूरमध्येही या रोगाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील गायिंमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून सुरुवातीला गाईच्या पोटाच्या बाजूला गाठ झाल्याचे आढळून येत आहे. या विचित्र रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून हा त्वचारोग सांसर्गिक असल्याचे पुढे आले आहे.

पाय आणि तोंडाच्या माध्यमातून तसेच हवेच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार झाला असून अशी लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर लसीकरण करण्याची सूचना करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली असून महाराष्ट्र सीमेच्या सहा बाजूला चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.

जनावरांच्या तपासणीसाठी आरकेरी, सिद्धापूर, कनमडी, आगरखेड, शिरडोन, धुळखेडा या सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर आवश्यक लसीकरण व उपचार केले जात आहेत. खिलारी गाईमध्ये अशा प्रकारच्या त्वचेच्या गाठींचा आजार आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गुरांची योग्य तपासणी आणि लसीकरण देखील करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाने आणि पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून ६ हजार लसींचा साठा केला असून प्रत्येक तालुक्याला ५०० लस पुरविण्यात येत आहेत. या रोगाबाबत दक्षता घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात जनावरांना लसीकरण सक्तीचे करण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पत्रके देखील वाटून जनजागृती केली आहे.

Tags: