राष्ट्रसेवादलाच्या बेळगाव शाखेच्या वतीने मराठी विद्यानिकेतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय निवासी शिबिराची सांगता झाली.
मराठी विद्यानिकेतन हायस्कुलमध्ये राष्ट्रसेवादलाच्यावतीने सहा दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वयंसेवक, शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवण्यासाठी, मैदानी खेळांचे महत्त्व समजून घेण्यासाठी, स्वावलंबन विकसित करण्यासाठी तसेच देशभक्ती वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. या शिबिरात दरररोज ध्वजारोहण, विविध क्रीडाप्रकार, लेझीम, झंझ, ढोल, गाणी, एरोबिक्सचे प्रशिक्षण देण्यात आले.

या शिबिरात तज्ज्ञ व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मराठी विद्यानिकेतन शाळेतील शिक्षकांनीही या शिबिरात स्वेच्छेने सहभाग घेत मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली. शिक्षक आणि शिबिरार्थी यांच्यात विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली. सहा दिवसांच्या या शिबिरात प्रत्येकाला मोबाईलशिवाय जगण्याचा अनुभव देण्यात आला.

या सहा दिवसात विद्यार्थ्यांनी पालकांना विसरून आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत तसेच शिक्षकांसमवेत वेळ घालविला. या शिबिरात सहा दिवसात एकमेकांशी मनमोकळेपणाने निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे शिबिराच्या सांगता समारोपात प्रत्येकाला आनंदाश्रू अनावर झाले. या सहा दिवसांत सर्वांमध्ये बंधुभावाचा विशेष बंध निर्माण झाला, हेच या शिबिराचे यश असल्याचे शाळा व्यवस्थापन कमिटीने सांगितले.


Recent Comments