विजापूर महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार असून, यासाठी भाजप, काँग्रेस, जेडीएस, आम आदमी पक्ष यासह अपक्ष उमेदवारांची निवडणुकीच्या तयारीसाठी लगबग सुरु झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्टींकडे उमेदवारीसाठी आस लावून आहेत.
विजापूरमध्ये होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची यादी वाढली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेस सह आम आदमी पक्ष देखील या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असून आम आदमी पक्ष पहिल्यांदाच या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. काँग्रेसमधून उमेदवार जाहीर करण्याची तयारी सुरु झाली असून जेडीएस मात्र कासवाच्या गतीने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.

भाजपमधील इच्छुक उमेदवारांची संख्या यंदा वाढली असून स्थानिक भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी यांच्यात उमेदवार निवडीसाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपाची विजापूर जिल्हा शाखा सध्या या दोघांच्या अडकित्यात अडकली असून आपापल्या उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी दोघांचेही पडद्याआड प्रयत्न सुरु आहेत. भाजप कार्यालयात कालपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. मात्र आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे भाजप कार्यालय सोडून सिद्धेश्वर संस्थेच्या कार्यालयात गेले आहेत. दुपारनंतर कार्यालयात आलेल्या यत्नाळांनी जातनिहाय इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे मत जाणून घेतले आहे.
महानगरपालिकेच्या ३५ प्रभागांसाठी निवडणूक होत असून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रत्येक प्रभागासाठी १० -१५ इच्छुक उमेदवारांची यादी पुढे आली आहे. भाजपमधील इच्छुकांनी आपल्या वॉर्डातील कार्यकर्ते आणि समाजातील इतर लोकांना सोबत घेऊन जात, संख्याबळ, पक्षनिष्ठा, आणि काही दिग्गजांची नावे सोबत घेऊन आपल्यामागे किती लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या वाढत्या संख्येबाबत आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विकासकामांवर प्रभावित झालेल्या उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज केले असून पात्र उमेदवार पाहून योग्य उमेदवार निवडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसमध्ये उमेदवारीचा मुद्दा उघडपणे चर्चेत आला नसला तरी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांची यादीही मोठी असल्याचे वृत्त आहे. इच्छुकांच्या उमेदवारीसंदर्भात काँग्रेसमध्ये देखील बैठका, चर्चा होत असून जेडीएस मात्र अद्याप या कोणत्याही हालचालीत गतिमान असल्याचे दिसत नाही. सोमवारपासून सुरु झालेल्या उमेदवारी अर्ज भरणा प्ररकियेत अद्याप एकाही उमेदवाराचा अर्ज सादर करण्यात आलेला नाही.


Recent Comments