Vijayapura

कडाक्याच्या थंडीतही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जनसागर

Share

महाराष्ट्रातील शक्तीपीठ, कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणाहून हजारो भाविक दाखल होतात. नवरात्रीनंतर पाच दिवसांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानीला अभिषेक घालण्यात येतो. यानिमित्ताने पदयात्रेच्या माध्यमातून हजारो भाविक तुळजापूरला प्रस्थान करतात.

हिंदूंचे आराध्यदैवत, आदिशक्ती तुळजाभवानी देवस्थान हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत असलेल्या या देवस्थानात भारतातील अनेक राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवानंतर पाच दिवसांनी या देवस्थानात देवीला विशेष अभिषेक घालण्यात येतो. याच दरम्यान कर्नाटकातून बेळगाव, विजापूर, बागलकोट, चिकोडी, कलबुर्गी या भागातून अनेक भाविक पालखी, मिरवणूक, पदयात्रेच्या माध्यमातून दाखल होतात.

कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान मंचकी निद्रावस्थेत असणाऱ्या तुळजाभवानीची पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. अभिषेक, पूजा या माध्यमातून तुळजाभवानीला साकडे घालण्यात येते. यादरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरमध्ये विशेष अन्नछत्र चालविले जाते. तसेच ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार, फळ वाटप करण्यात येते. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देवस्थान आणि पोलीस विभागाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या सर्व गोष्टी खंडित झाल्या होत्या. मात्र यंदा पुन्हा भाविकांचा अलोट सागर तुळजापूरकडे प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात जमीन, पाणी आणि भाषेच्या विषयावरून वाद सुरु आहे. परंतु आदिशक्ती तुळजाभवानीच्या दर्शनात याचा किंचितही फरक जाणवत नाही. उलट महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांची सोय, सुरक्षा आणि सेवा महाराष्ट्र शासन, देवस्थान कमिटी आणि पोलीस विभागाकडून पुरविण्यात येते. यासाठी परराज्यातून येणारे भाविक देखील महाराष्ट्र शासनाला दाद देतात.

दरवर्षी आपली मराठीच्या प्रेक्षकांना घरबसल्या तुळजाभवानीच्या दर्शनाचा लाभ मिळतो. आपली मराठीच्या माध्यमातून इत्यंभूत वृत्त प्रसारित करून तुळजाभवानीच्या भाविकांना घरबसल्या दर्शनाची संधी उपलब्ध होते, हे विशेष.

Tags:

tuljapur bhavani yatra