Belagavi

ओल्ड पीबी रोड “मृत्यूचा सापळा”! रस्त्यावर नारळाचे रोप लावून केला निषेध

Share

बेळगाव शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून या रस्त्यावरून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मार्गस्थ होताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. बेळगावमधील जुन्या पी बी रोडची देखील अशीच हालत झाली असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळे याचा संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये नारळाचे रोपटे लावून निषेध व्यक्त केला.

जुन्या पी बी रोड वरील खड्ड्यांमुळे येथील वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील अनेक ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला हि बाब आणून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये नारळाचे रोपटे लावून निषेध व्यक्त केला आहे.

बेळगाव शहराचा विकास स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होत आहे. अनेक प्रकल्प देखील राबविण्यात येत आहेत. मात्र सारेच प्रकल्प हे अवैज्ञानिक पद्धतीने करण्यात आले असून यामुळे नागरिकांना केवळ त्रासच झेलावा लागत आहे. शहरातील अनेक रस्ते अशाचपद्धतीने खड्डेमय झाले असून जीव मुठीत घेऊन फिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी ओल्ड पी बी रोड वरील या खड्ड्यांवर अनोखी शक्कल लढवत अभिनव पद्धतीने विरोध दर्शविला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात प्रशासन उदासीन असून या खड्ड्यांमध्ये नारळाची रोपे लावून लोकप्रतिनिधी आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगाव शहराचा विकास स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होत असल्याचे केवळ भासवण्यात येत असून ठिकठिकाणी झालेल्या या कामकाजातील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभाराचे वाभाडे निघत असून ओल्ड पी बी रोड वरील हा प्रकार देखील यापैकीच एक आहे. शहरातील अशा समस्या सोडविण्यात प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकारी केव्हा सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देतील याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

Tags:

belgaum old pb road shivaji bridge plantation