Belagavi

गोकाक सरकारी रुग्णालयाला घेराव   संतप्त शेतकरी नेत्यांचे आंदोलन

Share

गोकाक सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी पैसे मागण्यात आल्याची बाब समोर आली असून याविरोधात गोकाकमधील शेतकरी नेत्यांनी रुग्णालयाला घेराव घालून निदर्शने केली.

गोकाक तालुका सरकारी रुग्णालयात रुग्णांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप करत शेतकरी संघ आणि हसीरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला घेराव घालून आंदोलन छेडले. रुग्णालय प्रशासन आणि बेजबाबदार डॉक्टर यांच्याविरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी रायबाग येथील कविता बेळगी नामक महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी मंगला सनदी नामक डॉक्टरांनी प्रसूतीनंतर बाळाला दाखविण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली. २ हजार रुपये दिल्यानंतर त्यांनी बाळ हातात दिले, असा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे तुक्कानट्टी येथील मायव्वा दड्डीमनी नामक महिलेचे कुटुंब नियोजनासाठी ऑपरेशन करण्यात आले. मात्र हे ऑपरेशन देखील अयशस्वी ठरले आहे. शेतकरी कार्यकर्त्यांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या मंगला सनदी यांना आंदोलनकर्त्यांनी बाहेर बोलाविले. मात्र यावेळी डॉक्टर आणि आंदोलकांमध्ये वादावादी देखील झाली.

यासंदर्भात मुख्य वैद्याधिकारी डॉ. रवींद्र अंटीन यांनी संबंधित महिलांना कशापद्धतीने भरपाई देता येईल, याबाबत ३ दिवसांनी कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनात मंजू पुजेरी, जिल्हाध्यक्ष इळीगेर, गुरुराज आदींसह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags: