बुरुड गल्ली येथे विजयादशमीच्या निमित्ताने श्री भिष्ठादेवी यात्रा थाटामाटात संपन्न झाली. या यात्रोत्सवात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन यात्रा जल्लोषात पार पाडली.
दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने साजरी होणारी श्री भिष्ठादेवी यात्रा कोरोनामुळे स्थगित झाली होती. मात्र यंदा हि यात्रा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडली. विजयादशमीनिमित्त महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, बेळगाव शहर गुन्हे शाखेचे एसीपी एस आर कट्टीमनी आणि नवजीवन रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. सतीश चौलीगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, यात्रा महोत्सवासारखे धार्मिक कार्यक्रम आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपली संस्कृती जपली पाहिजे, विशेषत: आपल्या संस्कृतीच्या रक्षणात तरुणांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तरुणांनी आपल्या शिक्षणासह संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर एसीपी एस आर कट्टीमनी बोलताना म्हणाले, बेळगाव शहर हे विविधतेत एकता पाहणारे शहर आहे. बेळगावात अनेक उत्सव उत्साहात साजरे होताना पाहायला मिळतात.आपल्या पोलीस विभागाचे जवान दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होत आहेत याचे विशेष कौतुक वाटते. आज तरुणांना अधिक महत्व देणे गरजेचे असून तरुणांनी अशा कार्यक्रमासोबतच उच्च शिक्षणाचे महत्व देखील समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मेदार समाजातील परशुराम साळुंके, वैद्यकीय क्षेत्रातील मारुती मेदार आणि क्रीडा क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविणारे अभिषेक नवले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मेदार समाजाचे अध्यक्ष प्रकाश नेसरीकर, यात्रा कमिटी अध्यक्ष लक्ष्मण बुरुड, अजित मादर, प्रसाद देवरमनी, रामचंद्र पुजारी, गौतम लोंढे, अकील पेटकर, राघवेंद्र मडिवाळर, मल्लेशी कोरडे, आनंद मेदार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments