Belagavi

मूडलगी पंचमसाली आरक्षणासंदर्भात बैठकीचे आयोजन

Share

पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत समाविष्ट करावे यासाठी मूडलगी येथे आंदोलन छेडण्यात येणार असून सरकारवर दबाव टाकण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यातआले आहे अशी माहिती कुडलसंगम पिठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी दिली.

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्वपक्षीय सभा बोलाविली होती. यावेळी पंचमसाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक घोषणा करण्याची ग्वाही देखील देण्यात आली होती. पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी बेळगाव सुवर्णसौध समोर उपोषण सुरु करण्यात आले असून सरकारने दिलेला शब्द न पाळल्यास भव्य पदयात्रा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बी एस येडियुरप्पा यांनी दिलेला शब्द देखील पाळला नाही. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आपला शब्द पाळला नाही. यामुळे त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभागृहात आरक्षणासंदर्भात आवाज उठविला. मात्र यावेळीही मुख्यमंत्र्यांकडून आमच्या समाजाला तोंडाला पाने पुसण्यात आली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेस आर के पाटील, हणमंत कोंगाली, राजेंद्र हरकुनी, रुद्रण्णा चंदरगी, बी आय पाटील आदींसह इतर समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

panchamasali swamy