देव, देश अन धर्माच्या रक्षणाच्या हेतूने बेळगावात यंदा काढण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसऱ्यादिवशी, बुधवारी सकाळी शानदार समारंभात सांगता झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे प्रसिद्धीस आलेले चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारतमाता आणि हिंदू धर्माच्या जयघोषाच्या घोषणा देत शिवभक्तांनी सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा नवा संकल्प नव्या उमेदीने या निमित्ताने केला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्रात बेळगावात भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येते. यावर्षीही सलग दहा दिवस काढलेल्या या दौडीला तमाम बेळगाववासीयांकडून उत्स्फूर्त आणि जल्लोषी प्रतिसाद लाभला. दररोज पहाटे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात परंतु तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने शिवभक्तांनी दौडीत सहभाग घेतला. त्यांचे बेळगाववासीयांनी तितक्याच उत्साहात स्वागत केले. खासकरून महिला वर्गाने रात्र-रात्र जागून दौडीच्या मार्गावर स्वच्छता करून आकर्षक रांगोळ्या काढून, फुलांची सजावट करून दुर्गामाता दौडीचे स्वागत केले. प्रत्येक गल्लीत बाल शिवाजी, जिजामाता आणि मावळ्यांचे सजीव देखावे साकारण्यात आले. अनेक ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
दरम्यान, बुधवारी पहाटे शहरात ठिकठिकाणी दुर्गामाता दौडीचा संचार झाल्यानंतर कॉलेज रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज चौकात दौडीचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी प्रख्यात चित्रपट, नाट्य अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोले यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या नुकत्याच निर्मिलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटामागची संकल्पना त्यांनी यावेळी स्पष्ट केली. बेळगावचे लोक हे येथील कुंदा आणि मांड्यापेक्षाही गोड आहेत, माझ्या शंभूराजे नाट्यप्रयोगालाही त्यांनी डोक्यावर उचलून घेतले. त्यामुळेच महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूरनंतर ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा प्रीमिअर शो बेळगावात घेतला. घरच्या लोकांनी लेकराला उचलून घेतलं की, लेकरू उंच दिसतं, बेळगावची माणसं घरची आहेत. म्हणून मी या चित्रपटाचा प्रीमिअर बेळगावात आयोजित केल्याच त्यांनी सांगितलं. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
अवघ्या 9 वर्षांच्या लेकराला आग्र्याला का नेत आहात? या जिजाऊ माँसाहेबांच्या प्रश्नाला, शिवरायांनी, ‘लाल किल्ल्यावर भगवा फडकवायचं स्वप्नं शंभूराजांच्या डोळ्यात पेरायचं आहे’ असे उत्तर शिवरायांनी दिले होते. 356 वर्षांपूर्वी ज्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवरायांनी मुघल बादशहाच्या थेट नजरेला नजर भिडवली, त्या लाल किल्ल्यात ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. शिवरायांवर साधारण नव्हे तर भव्यदिव्य चित्रपट बनवायचा हा माझा हेतू होता. शिवरायांचे तेजपुंज व्यक्तिमत्व, त्यांचा लढाऊ बाणा, स्वाभिमान केवळ देशालाच नव्हे तर अवघ्या जगाला दाखवायचा म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हा स्वाभिमान जगापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुमची आहे असे सांगून चित्रपटाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणावेळी शिवभक्तांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments