सर्वत्र नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी सुरु असून या सर्व विधींमध्ये महिलावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. दांडिया, लेझीम, यासह विविध धार्मिक कार्यक्रमात महिलावर्गाने मोठा सहभाग घेतला आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी प्रामुख्याने महिलावर्गाचा प्रयत्न सुरु आहे. विजापूरमधील महिलावर्गदेखील नवरात्रोत्सवानिमित्त विविध रितीरिवाजांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा करत आहे.
नवरात्रीत आदिशक्तीचा जागर केला जातो. देवीच्या या उत्सवात महिलावर्गाचा आदर करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या संस्कृतीत महिलांचा अवमान केला तर आदिशक्तीचे पूजन करणे व्यर्थ ठरेल. नवरात्रोत्सवानिमित्त महिलावर्गाकडून विविध वेशभूषेचा माध्यमातून सण साजरा केला जातो. विजापूरमधील गच्चीनकट्टी कॉलनी येथे अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या श्री अंबाभवानी मंदिरात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कल्याण नगर, लक्ष्मी नगर, विद्या नगर यासह अनेक भागातील महिलावर्ग या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. याठिकाणी आलेल्या महिलांनी देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
गच्चीनकट्टी कॉलनीतील अंबाभवानी मंदिराची मोठी ख्याती आहे. येथील देवता हि जागृत आहे. संकटकाळात भक्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या देवीच्या प्रांगणात नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना विशेष महत्व देण्यात आले असून यानिमित्ताने येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. याचबरोबर दांडियाचेही आयोजन करण्यात आले होते .
महिलांसाठी प्रामुख्याने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणात पुरुष वर्गाचीही मोठी साथ मिळते. आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे महत्वाचे आहे.


Recent Comments