Belagavi

बेळगावच्या मध्यवर्ती भागात प्रचंड उत्साहात श्री दुर्गामाता दौड

Share

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रानिमित्त आज नवव्या दिवशी बेळगावच्या मध्यवर्ती भागात प्रचंड उत्साहात श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सजीव देखावे, भगवे ध्वज, पताका आणि भगवे फेटे, टोप्या, आणि पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या धारकऱ्यांमुळे नवचैतन्य निर्माण झाले होते.

होय, बेळगाव शहरात गेल्या २० वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सवा निमित्त दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने नेहमीच्या तुलनेत अत्यंत उत्साह आणि जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. आज ताशिलदार गल्लीतील श्री सोमनाथ मंदिरात पूजन करून ध्वज चढवून प्रेरणा मंत्र पठण करून आजच्या दुर्गामाता दौडीची सुरवात करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून तरुण-तरुणींनी दौडमध्ये सहभाग घेतला.

शहरातील मठ गल्लीत यंदाच्या नवव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मठ गल्लीतील रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या घालून त्यावर फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी आकर्षक सजावट करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले होते. ध्वजवाहक पुढे जात असताना दौडमध्ये तरुण-तरुणी त्याच्यामागून शिस्तबद्धरीत्या कूच करत होते. यावेळी लहान मुलांनी शिवाजी महाराज व जिजामाता यांची वेशभूषा करून दौडमध्ये लक्ष वेधले. ध्वजाला हार घालून व आरती करून जनतेने दौडचे स्वागत केले. यावेळी सिरीगन्नड़ युवक मंडळाने रस्त्यावर ध्वज लावून दौडीचे स्वागत केले. यावेळी दौडचे स्वागत करताना आनंद बालोगी म्हणाले की, बेळगावी शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मंगळवारी ९ व्या दिवशी काढलेल्या दौडचे मठ गल्लीतील युवक मंडळांने भव्य स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या तरुणांसाठी आदर्श आहेत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी अहोरात्र कार्य केले, त्याचप्रमाणे भारतातील तरुणांनी धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे. शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांच्या संवर्धनात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दौडमध्ये सहभागी झालेल्या युवतींनी सांगितले की, दुर्गामाता दौड हिंदू धर्म संरक्षण आणि जागृतीसाठी काढली जाते. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दौडमध्ये सहभागी होत आहोत. यावेळीही दौडचे नियोजन खूप चांगले आहे. आम्ही सर्वजण पहाटे उठलो, रांगोळ्या वगैरे घालून सर्व तयारी केली आणि दौडमध्ये सहभागी झालो असे त्यांनी सांगितले.

ताशिलदार गल्लीतून सुरु झालेल्या दौडने फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनी मंदिर, मठ गल्ली, कलमठ गल्ली, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मीनाक्षी हॉटेल क्रॉस, मुजावर गल्ली, कांगले गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, फर्स्ट क्रॉस, तानाजी गल्ली, समर्थनगर क्रॉस नं ४ व ५, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज मार्गे संचार करून शनिमंदिर येथे दौडीची सांगता करण्यात आली.

Tags:

belgaum durgama doud