जगातील सर्व मानव शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या भिन्न आहेत. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले तरी स्वावलंबी होणे शक्य नाही. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधा देण्यासाठी आमची संस्था विविध देशांतील विविध संस्थांच्या सहकार्याने काम करत आहे असे यूएसए स्थित व्हॉइस ऑफ स्पेशली एबल पीपलचे संस्थापक प्रणव देसाई यांनी सांगितले.
बेळगावच्या शारीरिक अपंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अळवण गल्ली, शहापूर येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅप्ड संस्थेत आयोजित दिव्यांगांना साहित्य वितरण कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना प्रणव देसाई म्हणाले की, जगातील दिव्यांग व्यक्तींनी विकास साधावा, हीच आमची अपेक्षा आहे. भारतातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, हवाई बंदरे इत्यादी ठिकाणी रॅम्प अनिवार्य केले पाहिजेत. जेणेकरून सर्व दिव्यांगांना सर्वांप्रमाणेच जगता येईल. त्या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेचे सरकारला आवाहन करून सरकारशी हातमिळवणी करणार आहोत. असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडिकॅप्ड, बेळगाव, कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जलतरणपटू राघवेंद्र अणवेकर यांचे सहकार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबत बेळगावचे नगर सेवक स्वेच्छेने सेवा देत आहेत, हे स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून आलेले जीतो संस्थेचे सचिव, सामाजिक कार्यकर्ते अमित दोशी यांच्या हस्ते व्हील चेअर, शिलाई मशीन व बावीस सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शारीरिक विकलांग संघटनेचे अध्यक्ष प्रणव अणवेकर, सचिव आरिफ वाळेकर, गिरीश, दयानंद, वामन, नीता आदी उपस्थित होते.


Recent Comments