Belagavi

बैलहोंगल डीवायएसपी शिवानंद कटगी यांच्या निलंबनाची मागणी

Share

शिवानंद कटगी यांची बैलहोंगलचे डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या भागातील दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शिवानंद कटगीर हे स्वतः एफआयआरमधून आरोपींची नावे वगळत असल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती, भीमवादच्या वतीने त्यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन पोलीस उपायुक्त रवींद्र गडादि यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात असूनही दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत. याची प्रचिती बैलहोंगलमध्ये आली आहे. एका दलित मुलीचा शौचालयातील वायरल झालेला व्हिडीओ हा दलितांवरील अत्याचाराचा एक नमुना असून याबाबत या भागाचे डीवायएसपी शिवानंद कटगीर यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नसल्याने दलित समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदर घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला असून एफआयआरमधील आरोपींची नावे बदलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवानंद कटगी हे दलितांवर अन्याय करत असून त्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करत बेळगावमध्ये सोमवारी निदर्शने करण्यात आली. किल्ला तलावापासून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरटीओ सर्कल मार्गे एसपी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी पोलीस उपायुक्त डॉ. रवींद्र गडादि यांच्याकडे निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना सुरेश चलवादी म्हणाले, शिवानंद कटगी यांची बैलहोंगल डीवायएसपी पदी नियुक्ती झाल्यानंतर येथील दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. येथील दलितांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नाही. दलितांवर झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार केल्यानंतर तक्रार बदलण्यात येत आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपींना पाठीशी घालण्यात येत आहे. आरोपी शेजारी उभे असले तरीही त्यांना फरार झाल्याचे दाखवले जात आहे. बैलहोंगलमध्ये शाळेतील एका विद्यार्थिनीचा शौचालयातील व्हिडीओ वायरल झाला असून यानंतर आरोपीने शाळेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीविरोधात दोन महिन्यांनंतर एफआयआर दाखल करण्यात आला मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी सुरेश चलवादी यांनी केली.

यावेळी बोलताना रवी बस्तवाडकर म्हणाले, शिवानंद कटगी यांची नियुक्ती बैलहोंगलमध्ये झाल्यानंतर याच तालुक्यातील चार गावांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. शिवानंद कटगी हे नेहमीच सवर्णांची बाजू घेतात. त्यांच्याकडून सातत्याने दलितांवर अत्याचार होतात. यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान काळ्या फिती बांधून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवानंद कटगी यांच्याबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या असून त्यांच्यामाध्यमातून दलितांवर अन्याय होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याच संदर्भात आज डीसीपींकडे निवेदन सोपविण्यात आले असून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

Tags:

bailhongal dss protest