Belagavi

पाचव्या दिवशीच्या दौडीत मराठी-कन्नड भाषिकांचा सहभाग !

Share

बेळगावातील वडगाव, जुने बेळगाव परिसरात आज नवरात्रानिमित्त पाचव्या दिवशीची भव्य दुर्गा माता दौड काढण्यात आली. कन्नड भाषिक आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आजच्या दौडीत उत्साहाने भाग घेऊन सामंजस्याचे प्रदर्शन घडविले.

होय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने नवरात्रानिमित्त गेली अनेक वर्षे बेळगाव परिसरात दुर्गामाता दौड काढण्यात येते. बेळगावमध्ये अतिशय भव्यपणे साजरा केला जाणाऱ्या दसरा उत्सवाला यामुळे एक वेगळीच शान येते. आज दुर्गामाता दौडच्या पाचव्या दिवशी वडगाव, जुने बेळगाव परिसरात चैतन्यमय वातावरण पसरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दौडला चालना देण्यात आली. यावेळी महिलांनी दौडच्या मार्गावर सुबक रांगोळ्या घालून मार्ग सजवला होता. विशेष म्हणजे यावेळी दौडमध्ये कन्नड समर्थक संघटनाही सहभागी झाल्या होत्या. महिलांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याची आणि धर्मध्वजाची आरती केली.


यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे यांनी, शहरात शिस्तबद्धरीत्या दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. आज वडगाव परिसरात दौड काढण्यात आली आहे. त्यात धारकरी एका वेगळ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. महिलांनी रात्र-रात्र जागून रांगोळ्या काढून दौडीचा मार्ग सुशोभित केला आहे. ठिकठिकाणी सजीव देखावे उभारले आहेत. दौड यशस्वी होण्याचे सारे श्रेय बेळगावचे समस्त नागरिक आणि महिलांना जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला पोलीस सहकार्य करत असून मी सर्वांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले. जुने बेळगाव येथील रहिवासी जयवंत खन्नूकर म्हणाले, या उपक्रमात ज्येष्ठांचाही सहभाग आहे. या दौडमुळे येथे पवित्र वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने तरुणांमध्ये पावित्र्याची भावना निर्माण झाली. समाजाला वाईट सवयीपासून दूर ठेवण्याचे आणि समाजाला एकत्र करण्याचे काम या दौडच्या माध्यमातून केले जात आहे. त्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापन संभाजी भिडे गुरुजी यांचे आभार मानले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.


यावेळी बोलताना रोशनी कणबरकर या युवतीने सांगितले की, आज वडगाव परिसरात दौड सुरू आहे. हे भाग्य मला चार वर्षांनी मिळाले. आम्हाला शिवाजी महाराजांचा खूप अभिमान आहे. दौड मरगाई गल्ली येथे येताच रस्त्याच्या दुतर्फा जमून स्वागत करण्यात आले. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या सजल्या आहेत. यावेळी शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आजची पाचव्या दिवशीची दौड यशस्वी केली. यावेळी जनतेने मोठ्या उत्साहात दौडमध्ये सहभाग घेतला आणि मार्गावर जल्लोष केला.

Tags:

belgaum festival belgaum shri durga mata doud dasara festival durgamata doud