‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती’ या काव्यपंक्तींचा तंतोतंत प्रत्यय यावा अशा थाटात बेळगावात आज चौथ्या दिवशीची दुर्गामाता दौड सळसळत्या उत्साहात काढण्यात आली. सदाशिवनगर परिसरात भल्या पहाटे चैतन्यपूर्ण शिवमय वाटेवर या दौडीमुळे निर्माण झाल्याचे पहावयाला मिळाले.
होय, दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बेळगावात नवरात्रोत्सवात अखंड ९ दिवस भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येते. दररोज भल्या पहाटे निघणाऱ्या दौडीत आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे दौडीवर मर्यादा आल्या होत्या. परंतु यंदा कोरोनाची काळी छाया दूर झाल्याने पुन्हा नव्या दमाने, नव्या उत्साहाने दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. आज नवरात्राच्या चौथ्या सदाशिवनगर व परिसरात दौड काढण्यात आली. प्रेरणामंत्र पठण करून ध्वजारोहण करून दौडीला प्रारंभ करण्यात आला. हजारो युवक-युवती आणि लहान मुलेदेखील मोठ्या आवेशाने आणि अभिमानाने दौडमध्ये सहभागी झाले होते. मार्गांवर भव्य आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे शिवरायांचे पुतळे पुजविण्यात आले होते. त्यामुळे दौडमध्ये सहभागी झालेल्याना आणखी प्रेरणा मिळत होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून दौडीचे स्वागत करण्यात आले.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना सदाशिवनगर येथील गृहिणी प्रमिला विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की, यंदा दुर्गामाता दौडला अविश्वसनीय प्रतिसाद मिळाला आहे. भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची प्रेरणा, स्फूर्ती मिळते. त्यामुळे दरवर्षी असे उपक्रम व्हायला पाहिजेत.

आणखी एक गृहिणी स्नेहल अपूर्व जाधव म्हणाल्या की, दौडच्या स्वागतासाठी आम्ही काल रात्रीच रांगोळ्या घालून, परिसर सुशोभित केला आहे. यंदा कोरोना नसल्याने दौडला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. लहान मुलेही उत्साहाने सहभागी होत आहेत हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हातात तलवारी, भगवे ध्वज घेतलेले हजारो युवक-युवती आजच्या दौडमध्ये प्रचंड उत्साहाने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतमाता आणि हिंदू धर्माचा जयघोष करत धारकऱ्यांनी उत्साहात व शिस्तबद्धरीत्या दौड पूर्ण करून चैतन्यमय वातावरणाची निर्मिती केली.


Recent Comments