Vijayapura

नवरंगात न्हाऊन निघतोय विजापूरचा नवरात्रोत्सव

Share

सण म्हटलं कि महिला वर्गाची लगबग नेहमीच सुरु असते. श्रावणानंतर लागोपाठ येणाऱ्या सणांसाठी महिलावर्गाची दररोज धावपळ सुरु असते. स्वयंपाक, नैवेद्य, पूजा, आरती अशा अनेक तयारींमध्ये गुंतून राहणाऱ्या महिलावर्गाला नवरात्रीत मात्र दररोज थीमनुसार रंगीबेरंगी कपडे परिधान करण्याची संधी मिळते. नऊ दिवस विविध रंगानुसार साऱ्याच महिला पोशाख परिधान करतात. सध्या विजापूरमध्ये महिलावर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत असून भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.

 

नवरात्र हा देवीची उपासना करण्याचा उत्सव आहे. कर्नाटकात दसरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणात नऊ दिवस आदिशक्तीच्या नऊ विविध स्वरूपाची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजया दशमी साजरी केली जाते. शमीच्या झाडाची पूजा यादिवशी करण्यात येते. हा सण विजापूरमध्येही मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत महिलावर्गाची धामधूम सुरु आहे. घरांमध्ये तेवणारा अखंड दिवा आणि अलीकडे रंगांच्या थीम नुसार वेगवेगळ्या शैलीतील पोषाखाच्या माध्यमातून महिलावर्गाकडून साजरी होत असलेली नवरात्र हे विजापूरमध्ये आकर्षण ठरत आहे. एकाच रंगाचा पोशाख परिधान करून महिलावर्ग फोटो क्लिक करण्यात गुंतल्या आहेत. हेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून नवरात्रीचा आनंद लुटत आहेत.

 

विविध मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि देवीची आरास यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. गल्लोगल्ली नवरात्रीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात एकाच रंगाच्या साड्या आणि इतर पोशाख परिधान करून महिला वर्ग सहभागी होत आहे. भजन, आरती आणि विविध धार्मिक उपक्रम या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दांडिया कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात देखील महिला वर्गाचा मोठा सहभाग आहे.

दांडिया, विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, जगदंबेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अशा पद्धतीतून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित होत आहे. महिलावर्गासाठी चैतन्यदायी असणारा नवरात्रोत्सव अलीकडे आधुनिक पद्धतीने साजरा होत आहे.

Tags:

vijapur navratri