Belagavi

“लंपी स्किन”वर लस नाही; मार्गदर्शन सूचनांचे पालन करा : डॉ. आनंद पाटील

Share

जनावरांमध्ये आढळणाऱ्या सांसर्गिक लंपी स्किन या रोगावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक लस देत असून शेतकऱ्यांनी आपल्या घरात तसेच गोठ्यात स्वच्छता राखून रोग नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव पशु विभागाचे सहायक संचालक डॉ. आनंद पाटील यांनी केले आहे.

बेळगावमधील पशुविभाग कार्यालयात आपली मराठीशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून बेळगाव तालुक्यात जनावरांमध्ये त्वचेचा आजार आढळून येत असून या आजाराची लक्षणे बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील जनावरांमध्ये दिसून येत आहेत. हा विषाणूजन्य आजार देशातील १८ राज्यांमध्ये आढळउन आला असून यावर योग्य उपचार उपलब्ध आहेत. या लक्षणांच्या आधारावर पशुवैद्य घरोघरी जाऊन मोफत उपचार करत आहेत. या आजराने बाधित जनावरांमध्ये तीव्र ताप, त्वचेवर पुरळ येणे तसेच डोळे आणि नाकातून पाणी येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लंपी या रोगावरील लसीबद्दल बोलताना ते म्हणाले, या रोगासाठी कोणतीही विशिष्ट अशी लस उपलब्ध नाही. परंतु मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व जनावरांना लस देण्यात येत आहे. गावोगावी प्रत्येक जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत १७४९८ जनावरांना लस देण्यात आली आहे. सध्या पशुवैद्यकीय विभागाकडे ५० हजारहून अधिक लसींचा साठा असून लसींचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. रोगनिवारणासाठी हुक्केरी, बैलहोंगल तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २० वैद्यकीय अधिकारी व ३० कर्मचाऱ्यांची टीम देखील तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले. सदर रोगाची लक्षणे दिसून आल्यास जनावरांना गोठ्यातून बाहेर पडू न देणे, गोठ्यातील माशा, किडे आणि डासांमुळे या रोगाचा संसर्ग अधिक वाढू शकतो. यामुळे रोग नियंत्रणात आणण्यासाठी सकाळची व संध्याकाळी गोठ्यात कडुलिंबाचा धूर करावा, स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लंपी या त्वचा रोगामुळे जनावरे दगावत चालली आहेत. सदर रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या रोगावर विशिष्ट अशी लस उपलब्ध नाही मात्र सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसार या रोगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य असल्याचे डॉ. आनंद पाटील यांनी सांगितले. मात्र यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags:

lumpiskin