बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ‘स्टोअर किपर‘ म्हणून काम केले आहे. त्यांना देशाच्या प्रतिमेबद्दल माहिती नाही, आणि ज्यांना इतिहास माहित नसतो त्यांनी कोणत्याही विषयावर भाष्य करू नये अशा शब्दात माजी मंत्री आर बी तिम्मापूर यांनी गोविंद कारजोळ यांना टोला लगावलाय.

गुरुवारी बेळगावच्या काँग्रेस भवनमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना लक्ष्य करत आर बी तिम्मापूर यांनी टोला लगावलाय. पालकमंत्र्यांना देशाची प्रतिमा माहित नाही. त्यांना इतिहास माहित नाही. काँग्रेस पक्ष हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले भाजपमध्ये कुणी आहे का? असा सवाल उपस्थित करत ‘भारत जोडो’ मोहिमेबाबत त्यांना बोलण्याचा हक्क नाही.

कारजोळांनी आधी इतिहास जाणून घ्यावा मात्र इतिहासाची माहिती नसलेल्यांनी कोणतीही निरर्थक विधाने करू नयेत अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला. देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्य असणाऱ्या राहुल गांधींच्या माध्यमातून भारत जोडो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत जोडो पदयात्रेसाठी बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघातून ३० सप्टेंबर रोजी चित्रदुर्ग येथे होणाऱ्या यात्रेत १० हजार हुन अधिक काँग्रेस सदस्य सहभागी होणार आहेत. भारत जोडो पदयात्रा हि सत्ता किंवा पदासाठी नाही तर देशात सुरु असलेल्या स्वार्थी राजकारणाविरोधात, दिवसागणिक गगनाला भिडणाऱ्या महागाईविरोधात सुरु करण्यात आली असल्याचेही तिम्मापूर यांनी सांगितले
यावेळी काँग्रेस नेते सदानंद डंगणवर बोलताना म्हणाले, देशाला एकसंघ करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेली भारत जोडो पदयात्रा ३० सप्टेंबर रोजी कर्नाटकात दाखल होईल. बेळगाव मधील हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. दरवाढ, धर्माच्या नावाखाली सुरु असलेले राजकारण आणि यामुळे उद्भवणाऱ्या अनुचित घटना, कायदा सुव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकारला येत असलेले अपयश या सर्व गोष्टी जनतेला पटवून देण्यासाठी भारत जोडो पदयात्रा आयोजिण्यात आल्याचे डंगणवर म्हणाले.
या पत्रकार परिषदेस शहर जिल्हाध्यक्ष राजू सेठ, वकील आर पी पाटील, परशुराम वग्गन्नावर, सलीम खतीब, गपूर घीवाले, गजू धरनायक आदी हजर होते.


Recent Comments