कर्नाटकात हिंदी दिन साजरा केला जाऊ नये अशी भूमिका मांडत बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. केंद्राने हिंदी लागू केलेल्या धोरणाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
कर्नाटकात हिंदी दिन साजरा केला जाऊ नये हि भूमिका ठेवून कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाने आज बेळगावमध्ये आंदोलन केले. संविधानातील सर्व भाषांना समान दर्जा द्यावा, सर्व भाषिकांना शिक्षण आणि नोकरीत समान स्थान दिले जावे, कर्नाटकातील हिंदी भाषेतील कार्यक्रम बंद करण्यात यावेत, अशा मागण्या करत राणी चन्नम्मा चौकात करवेने निदर्शने केली.
यासंदर्भात करवे कार्यकर्ते महांतेश यांनी सांगितले, १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला जातो. मात्र कर्नाटकात याविरोधात काळा दिन पाळण्यात येतो. केंद्र सरकार हिंदी भाषिकेतर राज्यांवर हिंदी लादत असून याचा कर्नाटकातील कोट्यवधी जनता निषेध करत असल्याचे ते म्हणाले. ()
या आंदोलनात वाजिद हिरेकुडी, युसूफ, युनूस, रेश्मा कित्तूर, मल्लिका वाफी, अनिता कोळी, राजू रोट्टी आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
याचप्रमाणे रेल्वे स्थानकानजीक करवेच्या नारायणगौडगटाच्या कार्यकर्त्यांनीही हिंदी विरोधात आंदोलन छेडले. कन्नड ही कर्नाटकातील अधिकृत भाषा आहे. त्यामुळे रेल्वे आणि स्थानकांमध्ये कन्नड भाषेचा वापर अनिवार्य करण्याच्या मागणीसाठी त्यांनी रेल्वे स्थानकासमोर निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
यावेळी दीपक गुडगनट्टी, महादेव तळवार आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments