Belagavi

केपीटीसीएल परीक्षा भरती गैरप्रकार प्रकरणी बंगळूरच्या एकाला अटक

Share

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे केपीटीसीएल परीक्षा भरती गैरप्रकार प्रकरणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून तपासासाठी न्यायालयीन कोठडीत ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची एकूण संख्या 17 झाली आहे.

गोकाक शहरात 7 ऑगस्ट रोजी हेस्कॉम भरती परीक्षेतील गैरप्रकार पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाचा तपास करून बेळगाव जिल्हा पोलिसांनी एकूण 17 आरोपींना अटक केली आहे. नव्याने देवसंद्रा, बेंगळुरू येथील 37 वर्षीय मोहम्मद अझीमुद्दीन नावाच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. तो दिल्ली व हैदराबाद येथून विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे बेळगाव जिल्ह्यातील संजू भंडारी व इतर लोकांना विकत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून दोन मोबाईल आणि 179 इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी सुसज्ज 07 एन 95 मास्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी सुसज्ज 41 बनियन, विविध प्रकारच्या 445 इलेक्ट्रॉनिक इअरफोन, 554 विविध प्रकारच्या चार्जिंग केबल्स आणि 06 वॉकीटॉकी जप्त केल्या आहेत.

 

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, केपीटीसीएल परीक्षेतील गैरव्यवहाराचे  अवैध कनेक्शन देवसंद्रा बेंगळुरपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मोहम्मद अझीमुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या केपीटीसीएलच्या राज्यव्यापी कनिष्ठ सहाय्यक स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या तपासात आमचे डीसीआरबीचे डीएसपी वीरेश दोडमणी यांनी एक विशेष टीम तयार करून तपास केला. याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून काही चाचण्यांमध्ये बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी वापरलेली माहिती व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी बंगळुरूच्या एसपी रोड येथे इलेक्ट्रॉनिक दुकान चालवतो. गेल्या 2019 पासून बेळगावातील काही लोक त्याच्याकडून अशा वस्तू खरेदी करत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी दिल्ली आणि हैदराबाद येथून या वस्तू आणून  केवळ कर्नाटकातच नाही तर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा यांसारख्या राज्यातही विकत होता. आरोपी हा मुडलगी येथील एका दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचा मित्र असून त्याने पैसे देऊन या वस्तू मिळवल्या. या संदर्भात आम्हाला फोन पे आणि मनी ट्रान्सफरमुळे बँक व्यवहारांची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात चौकशी करून अधिक माहिती गोळा करायची आहे. विशेष तपास पथक पुढील तपास करणार आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात अधिक माहिती संकलित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

आरोपीने स्मार्ट उपकरणांच्या बेकायदेशीर वापराविषयी माहिती दिली आणि परीक्षेदरम्यान आरोपीने स्मार्ट ब्लूटूथ उपकरणाद्वारे हे बेकायदेशीर कृत्य केले. चुंबकीय यंत्राचा वापर करण्यात आला आहे. अत्यंत संवेदनशील उपकरणांचा वापर करून त्यांनी ही उपकरणे असलेले ताबीज आणि मास्क बनवून घेतले आहेत. परीक्षार्थी ही उपकरणे बनियनमध्ये लपवून घेऊन जाण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी खरेदी करत. वायरलेस उपकरणांचा वापर कोणी केला आहे का, याचा तपास अद्याप झालेला नाही. या संदर्भात विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे असे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.

 

एकंदर, बेळगाव पोलिसांनी केपीटीसीएल परीक्षेतील गैरप्रकाराचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता पुढील पोलीस तपासातूनच अधिक माहिती समजायची आहे.

Tags:

#kptcl exam