Belagavi

मंत्री उमेश कत्ती यांच्यावर बेल्लद बागेवाडीत अंत्यसंस्कार

Share

हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्यावर बेल्लद बागेवाडी येथील त्यांच्या शेतात आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय आणि चाहत्यांनी एकच आक्रोश केला. राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षांचे नेते आणि हजारो नागरिकांनी उमेश कत्ती यांचे अंतिम दर्शन घेतले.

 

राज्याचे एक दिग्गज नेते, उत्तर कर्नाटकचा बुलंद आवाज, अन्न आणि वन मंत्री उमेश कत्ती हे मंगळवारी रात्री बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानाच्या बाथरूममध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळले. त्यानंतर त्यांना एम. एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सर्व उपचार निष्फळ ठरले आणि त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा ही बातमी समजताच संपूर्ण राज्य हादरले. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी एम. एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये  हॉस्पिटलमध्ये धाव घेत अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर आज, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उमेश कत्ती यांचे पार्थिव बेळगावच्या सांबरा विमानतळावर विशेष विमानाने आणण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहिली. अंतिम दर्शनासाठी 10 मिनिटे पार्थिव ठेवण्यात आला. यावेळी दहाहून अधिक स्वामीजींकडून मंत्रोच्चार करण्यात आला. यावेळी उमेश कत्ती यांची पत्नी, सून, मुलगी, अधिकारी आणि चाहत्यांनी एकच आक्रोश केला. मंत्री शिवराम हेब्बर, माजी राज्यसभा सदस्य डॉ.प्रभाकर कोरे, राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी, विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी, प्रकाश हुक्केरी, आमदार महादेवप्पा यादवाड, लक्ष्मी हेब्बाळकर, अनिल बेनके, दुर्योधन ऐहोळे, महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील आदींसह शेकडो राजकीय नेत्यांनी उमेश कत्ती यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहिली. यावेळी चाहते मोठ्या संख्येने जमले होते.

 

त्यानंतर उमेश कत्ती यांचे पार्थिव सुशोभित लष्करी वाहनातून त्यांचे मूळ गाव हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथे नेण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या चाहत्यांनी लाडक्या नेत्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नंतर हिरा साखर कारखान्याच्या आवारात जनतेला अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने चाहते व कार्यकर्त्यांनी दाखल होऊन अंतिमदर्शन घेतले. नंतर, बेल्लद बागेवाडी येथील मळ्यात वडील विश्वनाथ कत्ती आणि आई राजेश्वरी यांच्या समाधीशेजारी 50 हून अधिक पुरोहितांच्या उपस्थितीत लिंगायत वीरशैव धर्मानुसार अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अंतिम मानवंदना देण्यात आली. उमेश कत्ती यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उमेश कत्ती यांची पत्नी, मुले, भाऊ माजी खासदार रमेश कत्ती व त्यांचे कुटुंबीय, आप्त, नातेवाईक  व चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील, मंत्री गोविंद कारजोळ, आर. अशोक, अरग ज्ञानेंद्र, सी. सी. पाटील, शशिकला जोल्ले यांच्यासह जवळपास सर्व मंत्री, माजी उपमुख्यमंत्री  लक्ष्मण सवदी, माजी मंत्री ए. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, एमएलसी चन्नराज हत्तीहोळी आणि इतर नेते आणि हजारो चाहते अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.

 

8 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचणारे मंत्री उमेश कत्ती हे त्यांच्या थेट कृतीतून आणि बोलण्यातून इतरांपेक्षा वेगळे नेते ठरले होते. असा लोकनायक गमावणे हे त्यांच्या चाहत्यांचे, बेळगाव जिल्ह्याचे आणि संपूर्ण राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.

Tags:

#umesh katti belladbagewadi umesh katti funeral