काल रात्री बेंगळुरू येथील रामय्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांचे पार्थिव आज दुपारी बेळगावात दाखल झाले.
उमेश कत्ती यांचे पार्थिव बंगळुरू येथील एचएएल विमानतळावरून विशेष विमानाने बेळगाव येथील सांबरा विमानतळावर आणण्यात आले. यावेळी उमेश कत्ती यांच्या पार्थिवाला बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आदरांजली वाहण्यात आली.
कामगार मंत्री शिवराम हेब्बार, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी, प्रकाश हुक्केरी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अनिल बेनके, दुर्योधन ऐहोळे, महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील यांच्यासह शेकडो राजकीय नेत्यांनी, राज्यातील विविध धर्मगुरू आणि चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
उमेश कत्ती यांचे पार्थिव सांबरा विमानतळावरून बेळगावातील शिवबसव नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तेथे काही काळ दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर सजवलेल्या वाहनातून पार्थिव देह त्यांच्या मूळ गावी बेल्लद बागेवाडी येथे नेण्यात येणार आहे.
मंत्री उमेश कत्ती यांच्या पार्थिवाचे बेल्लद बागेवाडी येथे अंतिम दर्शन घेण्यासाठी जनतेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर संध्याकाळी उमेश कत्ती यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांच्या समाधीशेजारी त्यांच्याच शेतात संपूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments