शंकर पुजारी या १८ वर्षीय तरुणाने विजापुरातील दर्ग्याजवळील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात दगडी कोळशापासून उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ देवस्थानची लक्षवेधी प्रतिकृती उभारली आहे. विजापूर गजानन महामंडळाचे संस्थापक व माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी येथे भेट देऊन त्या तरुणाचा सत्कार केला.
केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीत आत नीट पाहिल्यास परमेश्वर आणि लिंग दिसते. मंदिराच्या मागे बर्फाचा डोंगर आहे, समोर नंदी, मंदिरावरील बुरुज पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. काही क्षण आपण खरोखरच केदारनाथमध्ये तर नाही ना असा भास होतो. अशी कलाकृती पाहण्यासाठी विजापूर येथील गजानन महामंडळाचे संस्थापक व माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी या ठिकाणी भेट देऊन शंकर पुजारी याचा सत्कार केला. नंतर कलाकृती व गणपतीचे पूजन केले. यावेळी दर्गा परिसरातील नागरिकांनी आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांचा सत्कार केला.
पुरस्कार स्वीकारताना पट्टणशेट्टी यांनी या मंडळाला महामंडळाने प्रथम पुरस्कार दिल्याची आठवण सांगितली. गणेशोत्सवासह धार्मिक सण कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यास मदत करतात. असे कलाकार समोर आल्यास त्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दर्गा परिसरातील नागरिक व महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments