बेळगावात आज पांगुळ गल्ली येथील श्री चंद्रप्रभस्वामी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने चातुर्मास संपल्यानंतर उपवास कार्यक्रमात सहभागी झालेल्या समाज बांधवांची मिरवणूक काढण्यात आली.
होय, बेळगावातील पांगुळ गल्ली येथील श्री चंद्रप्रभस्वामी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने आज, शुक्रवारी चातुर्मास पर्यूषण पर्वानिमित्त उपवास कार्यक्रमात सहभागी झालेल्या समाजातील सदस्यांची शोभायात्रा काढण्यात आली. पवित्र चातुर्मासानिमित्त जैन श्वेतांबर समाजाचे उपोषण व विविध कार्यक्रमांची आज, शुक्रवारी सांगता झाली. 24 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या विशेष कार्यक्रमात भगवान अजितशेखरजी महाराज यांचे शिष्य पपू पन्यास प्रवर श्री ओंकारशेखरविजयजी, पपू मैत्री शेखरविजयजी (आदी ठाणा 2) आणि साध्वी भगवंत यशप्रभा श्रीजी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य श्रेयांस प्रभाजी (आदी ठाणा 2) यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रम पार पडले.
यादरम्यान उपवासासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 45 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांसह 40 उपवास कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी 11 वर्षीय सदस्य अभिषेक संघवी यांनी सलग 31 दिवसांचे उपोषण केले. तर श्वेतांबर जैन समाजातील 78 सदस्यांनी सलग 8 दिवस उपवास केला. उपवास पूर्ण करणाऱ्या समाजातील सदस्यांची आज सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पूजन करून मिरवणुकीचे उदघाटन केले.
या कार्यक्रमाला संबोधित करताना स्वामीजींनी, पवित्र चातुर्मासाच्या निमित्ताने उपवासाचे पालन आणि त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी अहिंसा हे जैन धर्माचे सर्वात मोठे तत्व असल्याचे सांगितले. कोणत्याही सजीवाला इजा न करता आपण जगले पाहिजे. माणसांप्रमाणेच सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेली मिरवणूक पांगुळ गल्ली येथून निघून, भेंडीबाजार, खडेबाजार, रामदेव गल्ली, रविवार पेठ, मेणसी गल्लीमार्गे परत पांगुळ गल्ली येथे येऊन विसर्जित झाली.
मिरवणुकीत लहान मुले धर्मध्वज हातात घेऊन घोड्यावर स्वार झाली होती, तर मिरवणुकीत तरुण व ज्येष्ठांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
आमदार अनिल बेनके, अभय पाटील, इन न्यूजचे मुख्य संपादक राजशेखर पाटील, एसीपी नारायण भरमनी, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष विजय पोरवाल, आयटीबीपीच्या 44 व्या बटालियनचे कमांडंट अनिलकुमार अकर्निया, राजू खोडा, बाबुलाल शहा, पोपटलाल पोरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments