Belagavi

बेळगावात जल्लोषी वातावरणात बाप्पांचे आगमन !

Share

ढोलताशांचा कडकडाट, सनईचे मंगल सूर, फटाक्यांची आतषबाजी आणिगणपती बाप्पा मोरयाअसा जयघोष करत, भक्तीभावाने ओथंबलेल्या जल्लोषी वातावरणात बेळगाव परिसरात बुधवारी लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यात आले.

होय, कोरोनाच्या थैमानामुळे पडलेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर आता कोरोनाची काळी छाया गणरायाच्या कृपेने दूर झाल्याने गणेशभक्तांनी यंदाचं गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेळगाव परिसरात काल, बुधवारी पहाटेपासूनच लाडक्या बाप्पांचा आगमन सोहळा सुरु झाला. अधूनमधून कोसळणाऱ्या   पावसाच्या सरी जणू गणरायाच्या स्वागतासाठी वातावरण शुद्ध, स्वच्छ करत होत्या. होय, बेळगावात यंदा गणरायाचे अमाप जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून बेळगावातील गणेशभक्त गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. घरोघरी आबालवृद्धांनी आपापल्या परीने रात्र-रात्र जागून सुंदर देखावे उभारले. अगदी बुधवारी पहाटेपर्यंत सजावट आणि देखाव्यांची लगबग सुरु होती. त्यानंतर पुन्हा सकाळी लवकर उठून स्नानादिक कर्मे आटोपून नवे कपडे परिधान करून वाजतगाजत बापाला घरी आणण्यात आले.

दुचाकी, रिक्षा, कार आदी वाहनातून तर काहींनी पायी चालत जाऊन गणरायाला घरी आणले. काहींनी सवाद्य मिरवणुकीने तर काहींनी वाद्यांसोबतच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात घरी आणले. यावेळी बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. पूजा-स्वयंपाकाची तयारी करूनही न दमता महिलांनी औक्षण करून बाप्पाला घरी घेतले. दुपारी १-३० पर्यंत गणेश आगमनाचा शुभ मुहूर्त असल्याने बहुतेक भक्तांनी त्याच्या आतच घरी गणपती आणण्यावर भर दिला. बुधवारी सायंकाळी गणरायाच्या स्वागतासाठी पावसानेही हजेरी लावली. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री मूर्ती सवाद्य मिरवणुकीने मंडपात नेण्यात आल्या. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकातून येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. मंडळाच्या तरुण-तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला हे विशेष. झांज पथक, ढोलताशा पथक, लेझीम पथक अन त्या समोर आकर्षक पदन्यासावर नृत्य करणारे ध्वजपथक मिरवणुकीची शान वाढवत होते.

खडक गल्लीचा राजा, केळकरबागचा राजा आदींच्या गणेशमूर्तींची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. एकंदरीत पावसाची पर्वा न करता अनोख्या उत्साहात अन जल्लोषात बेळगावात गणेशाच्या आगमनाचा  जल्लोष करण्यात आला. घरगुती गणेशमूर्तींचे आगमन, पूजा-आरती झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक उत्सव मंडळांच्या मंडपात गणराया विराजमान झाले.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews GANESHCHATURTI BELGAVI