देशभराप्रमाणे बेळगावातही आता गणेशोत्सवाचे काउंट डाउन सुरु झाले आहे. अबालवृद्ध भक्तांना आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि लाडक्या बाप्पाला घरी आणतो असे प्रत्येकालाच वाटत आहे. या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीविक्रीसाठी बेळगावात आज एकच झुंबड उडाली.
होय, वर्षभर ज्या गणरायाच्या आगमनाची प्रतिक्ष असते तो सण आता केवळ काही तासांवर येऊन पोहोचला आहे. ११ दिवसांच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी फळे-फुले, सजावट आणि पूजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांचा महापूर आज बेळगावातील बाजारपेठेत लोटला. बेळगावातील गणपत गल्ली, रविवारपेठ, भावे चौक-कंबळी खूट, मारुती गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस, खडेबाजार, पांगुळ गल्ली आदी मध्यवर्ती बाजारपेठांत पाय ठेवायलाही जागा नाही अशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. केवळ बेळगावचा नव्हे तर तालुका, जिल्हा आणि नजीकच्या महाराष्ट्रातील शिनोळी, चंदगड, हलकर्णी आदी आणि गोवा भागातील गणेशभक्तांनीही ख्ररेदीसाठी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज बेळगावात गर्दी केली.
गणपतीसमोर ठेवली जाणारी फळे-फुले, कांगुणे, कच्चा नारळ, अगरबत्ती, कापूर, धूप, उद, वस्त्र, सफरचंद, पेरू, केळी आदी ५ फळे, शेवंती, डेलिया, झेंडू फुले, दुर्वा, तुळस आदी साहित्याची जोरदार खरेदीविक्री होताना दिसून आली. सजावटीच्या साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पांगुळ गल्लीतही ग्राहकांचा महापूर लोटला होता. गणरायाच्या आगमनाला आजचा केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, नकली फुलांच्या माळा, रंगीत कागद, पोस्टर्स, पडदे, कारंजे, लाईटच्या माळा, थर्मोकोलचे मखर आणि उंदीरमामासह विविध प्रकारच्या प्रतिकृती, शोभेची फुले, विविधरंगी रांगोळी आदी सजावटीच्या साहित्याची ग्राहकांनी खरेदी केली. 
शहापूर, वडगाव, खासबाग, टिळकवाडी आदी उपनगरी भागातील बाजारपेठांतही आज गणेशभक्तांनी सणाच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मंगळवार साप्ताहिक सुटीचा दिवस असूनही गणेशोत्सवामुळे बेळगावात आज दुकाने सुरूच ठेवण्यात आली होती.


Recent Comments