क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सवानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील वीजसेना आणि बेळगाव जिल्हा तसेच रायन्ना अभिमानी संघातर्फे क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सवानिमित्त आज बेळगावमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत शेकडो रायन्ना अभिमानी वाद्यवृंदासह सहभागी झाले होते. विविध संघटनांचे सदस्य, महिला पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी संगोळी रायन्ना पुतळा, पिरनवाडी येथून सुरु झालेली मिरवणूक उद्यमबाग औद्योगिक क्षेत्र, कॉलेज रोड, कॅम्प परिसर मार्गे गांधी भवन येथे समाप्त झाली. 
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष ह. नि. दोपक यांनी पिरनवाडी येथे संगोळी रायन्ना पुतळ्यावरून निर्माण झालेल्या संघर्षाची आठवण करून दिली. या चौकाचे नाव संगोळी रायन्ना चौक असे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून या चौकाचे लवकरात लवकर नामकरण होणे आवश्यक आहे. तसेच अग्निपथ योजनेतील सेनेला कर्नाटकात रायन्ना सेना असे नाव देण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगाव जिल्हा मानद अध्यक्ष सुरेश इटगी, जिल्हा उपाध्यक्ष मंजुनाथ हलगा आदींसह अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य युवा घटक अध्यक्ष महेश आर एस, राज्य प्रधान सचिव शिवपुत्र गाणधाळ, राज्य उपाध्यक्ष सच्चीदानंद, राज्य संघटना सचिव मोहनकुमार, कर्मचारी घटक अध्यक्ष रामप्रसाद गौड, बेळगाव जिल्हा मानद अध्यक्ष रवी भद्रकाली, सुरेश इटगी आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments