गेल्या 25 दिवसांपासून बेळगावात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी आज सातव्या दिवशीही गोल्फ ग्राउंडवर शोध मोहीम राबवण्यात आली. आज गोल्फ कोर्सच्या उत्तर टोकाला असलेल्या पाण्याच्या तळ्याजवळ बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले.
सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीएफओ डॉ. अँथोनी मरियम, एसीएफ मल्लिनाथ कुसानाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोल्फ मैदानाचा शोध घेत बिबट्याच्या पायाचे ठसे शोधून काढले.
ज्या ठिकाणी पायाचे ठसे आढळून आले त्या ठिकाणी ठसेतज्ज्ञांचे पथकही दाखल झाले होते. हनुमाननगर आणि जाधवनगरला जोडणाऱ्या डबल रस्त्याच्या आजूबाजूला वनरक्षक अलर्ट मोडवर तैनात आहेत. एकीकडे वनखात्याचे कर्मचाऱ्यांनी पायी फिरून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले, तर दुसरीकडे हत्तींवरूनही बिबट्याचा शोध घेण्यात आला. एवढे सलगे करूनही 25 व्या दिवशीही बिबट्या काही जेरबंद झाला नाही.
दरम्यान, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी आज गोल्फ क्लबला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बिबट्याच्या कारवाईबाबत वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कारवाईची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर गोल्फ क्लबमध्ये फिरून इरण्णा कडाडी यांनी तेथे लावलेले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेऱ्यांची पाहणी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना इरण्णा कडाडी यांनी बिबट्याला पकडण्यात सरकार कोणत्याही प्रकारे अपयशी ठरले नसल्याचा दावा केला. अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वन, महसूल आणि पोलीस विभाग यांच्या समन्वयासाठी समिती स्थापन करण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे कडाडी यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञ वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि हत्ती यांच्याकडून कारवाई करूनही बिबट्या पकडता आला नाही, ही मोठी खेदाची बाब आहे.


Recent Comments