विजापूर महानगर पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरून शहर भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शहरातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवीन घोषणाबाजी सुरू केली आहे. मूळ भाजप सदस्य आणि निवडणुकीसाठी भाजपात डेरेदाखल झालेले बाहेरचे सदस्य असा सामना सुरू झाला आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मतभेद सुरू झाले. तर दुसरीकडे काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलाबाबत आंदोलनही सुरू झाले आहे. याबाबत हा आहे संपूर्ण वृत्तांत…
होय, विजापूर महानगरपालिकेच्या सदस्यांना घरी जाऊन तीन-चार वर्षे झाली आहेत. शहरात नगरसेवकच नसल्याने प्रभागातील समस्यांना जबाबदार कोण, वॉर्डातील विकास खुंटत चालला आहे, असा सवाल करत नागरिकही संताप व्यक्त करत होते. राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या प्रभाग आरक्षणाच्या घोषणेनंतर काही वसाहतींमधील नागरिकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला, तर शहरातील 35 पैकी अनेक प्रभागांमध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरही आपला रोष व्यक्त करत आहेत. पुढील महानगरपालिका निवडणुकीत आम्हाला तिकीट मिळेल, असे नियोजन पक्षाने केले होते. मात्र, आता अन्य पक्षांचे कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याने मूळ भाजपवाल्याना वगळून भाजप अन्य कुणाला तरी तिकीट देईल या शंकेने त्यांनी मोहीम सुरू केली आहे. यातून आधी मूळ कार्यकर्त्यांचा विचार करा असा इशारा नेत्यांना देण्यात आलाय. याबाबत निवडणूक लढवू इच्छिणारे रवींद्र जाधव यांनी अधिक माहिती दिली.

विजापूर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, 8 ऑगस्ट रोजी प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबत 92 हरकती दाखल झाल्या आहेत. त्या तपासून राज्य सरकार अंतिम आरक्षण जाहीर करेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण देण्यात आले आहे. एकूण 35 वॉर्डांपैकी 17 वॉर्ड राखीव तर 18 सर्वसाधारण वॉर्ड आहेत असे जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर यांनी सांगितले.

प्रभाग आरक्षणाबाबत यापूर्वीच 92 हरकती दाखल झाल्या असून, दुसरीकडे महापालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या प्रत्येक प्रभागात वाढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक अजूनही अंतिम आरक्षण यादीच्या प्रतीक्षेत आहेत.


Recent Comments