‘सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी तरुणांनी लाच द्यावी, तरुणींनी पलंगावर चढावे‘, या काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बेळगावात आज जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रियांक खर्गे यांनी तातडीने युवा आणि महिलांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळी दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
आता प्रियांक खर्गे यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे मुलींकडे संशयाने पाहिले जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रियांक खर्गे यांनी राज्यातील महिलांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, राजस्थानच्या जालोरा जिल्ह्यातील सुराणा गावात इंद्रकुमार नावाच्या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार कुचकामी आहे. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा राष्ट्रपतींनी तेथील काँग्रेस सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारे निवेदन भाजप नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिले. या आंदोलनात भाजप महिला मोर्चा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, मुरुगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार, रुद्रण्णा चंद्रगी, यल्लेश कोलकार, मंजुनाथ पम्मार आदी भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments