बेळगावपासून १८ किलोमीटर दूर असलेल्या बेळवट्टी येथे रविवारी सकाळी बिबट्या दिसून आला होता, अशी माहिती नागरिकांकडून पुढे येत आहे. बेळवट्टी येथे दिसलेला बिबट्या आणि गोल्फ मैदानावरील बिबट्या हे दोन्ही बिबट्या वेगळे आहेत का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय बिबटया संदर्भातील अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत असून अनेक अफवांना पीक आले आहे.
५ ऑगस्ट रोजी जाधव नगर येथे दिसून आलेल्या बिबट्याने बेळगावमध्ये दहशत माजविली असून बिबट्याला शोधण्यासाठी वनविभाग कसोशीने प्रयतन करत आहे. गेल्या १२ दिवसांपासून हे शोधकार्य सुरु असून अद्याप बिबट्याचा शोध लागलेला नाही. यादरम्यान या परिसरातील २२ शाळांना सुट्टीही देण्यात आली होती आणि पुन्हा १६ ऑगस्टपासून शाळा सुरूही करण्यात आल्या. मात्र आता बिबट्या संदर्भात अनेक अफवा, फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असून नेमका बिबट्या कुठे दडून बसला आहे याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

रात्री १२ च्या सुमारास गोल्फ कोर्स मैदानाच्या भिंतीवरून बिबट्या उडी मारून गेल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र हि बाब पोलीस आणि वनविभागाच्या समोर येऊन सांगण्यास कुणाचीही तयारी नाही. याचदरम्यान हा बिबट्या बेळवट्टी येथील शेतवाडीत आढळून आल्याचे शिवाजी नलवडे या शेतकऱ्याने सांगितले. शेतात काम करताना आपण आणि आपल्या पत्नीने बिबट्याला पहिले, त्याचा फोटो मोबाईलवर काढण्याचा प्रयत्नही केला. बेळवट्टी येथून १८ किलोमीटर अंतरावर कावळेवाडी क्रॉस नजीक असलेल्या नलवडे यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचे कन्नड कृती समितीचे अशोक चंदरगी यांना कळविण्यात आले. शिवाय ग्रामस्थांनीही अनेक ठिकाणी बिबट्या पहिल्याच दावा केला जात आहे. बेळगावमध्ये आढळून आलेला बिबट्या बेळवट्टी येथे पोहोचण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी आहेत. त्यामुळे बिबट्या येथील भागात गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. काहींनी या भागातील उसाच्या मळ्यात बिबट्या गेल्याचे सांगितले. जंगल भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी बिबट्या हा तितका धोकादायक ठरणार नाही मात्र शहरातील संवेदनशील भागात बिबट्या हा नक्कीच धोकादायक ठरू शकेल, असे वनविभागाचे म्हणणे आहे. या परिसरातील २२ शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या असून बिबट्या शोध मोहीम आता आणखीन तीव्र करणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


Recent Comments