बेळगावातील मराठी शाळांमध्ये कन्नड शाळा स्थलांतरित करण्यात येत आहेत. मराठी शाळांत पुरेशा संख्येने विध्यार्थी असून देखील शिक्षक नियुक्त केले जात नाहीत याचा जाब महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आज शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. मराठी संस्कृती आणि शाळांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
होय, गणपत गल्लीतील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे कन्नड शाळेचे वर्ग भरविण्यात येत आहेत. त्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती नेते व कार्यकर्त्यांनी आज या शाळेला भेट दिली.
यावेळी शहर गट शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यात आली, मराठी शाळेत कन्नड शाळा स्थलांतराच्या कृतीचा निषेध करण्यात आला तसेच मराठी शाळांना सर्व सुविधा पुरवाव्या, शिक्षक भरती करावी आणि मराठी शाळांवरील अतिक्रमण थांबविले जावे अशी मागणी केली. यावेळी सदर कन्नड शाळा तात्पुरती हलवली असून लवकरच इतरत्र स्थलांतर करू असे आश्वासन शहर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
यासंदर्भात इन न्यूज आपली मराठीला माहिती देताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले की, बेळगावात मराठी शाळांत कन्नड शाळा स्थलांतरित करून मराठी संस्कृती दडपण्याचा काम सरकार करत आहे. यापूर्वी महाद्वार रोड येथील मराठी शाळा क्र. १२ मध्ये समर्थनगरच्या कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे. तात्पुरते स्थलांतर आहे असे सांगत आज अनेक वर्षांपासून ती शाळा मराठी शाळेतच भरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फुलबाग गल्लीतील मराठी शाळा क्र. ७ आणि कन्नड शाळा क्र. ७ या अवघ्या १०० फुटावर शाळा होत्या.
कन्नड शाळेची इमारत जीर्ण झाल्याचे कारण देऊन नवीन इमारत बांधेपर्यंत कन्नड शाळा मराठी शाळा क्र. ७मध्ये स्थलांतरित करतो म्हणून हलविण्यात आली. अनेक वर्षे कन्नड शाळेचे बांधलं सुरु होते. ते पूर्ण होऊन आता इमारत झाली तरी कन्नड शाळा अजूनही मराठी शाळेच्या पहिल्या मजल्यावरच भरविण्यात येत आहे. आता पुन्हा गणपत गल्ली मराठी शाळेत आणखी एका कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे. शाळांमध्ये भाषेचे राजकारण आणू नये. त्याचा विपरीत परिणाम विध्यार्थी आणि शिक्षकांवर होतो. सांबरा येथील मराठी शाळेत पुरेसे विध्यार्थी असून देखील समर्पक प्रमाणात शिक्षक नियुक्त केले नाहीत अशी तक्रार म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्याकडे आली आहे. हा सरळ सरळ मराठी भाषा आणि संस्कृतीवरील अन्याय आहे. तो आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा शुभम शेळके यांनी दिला.
यावेळी युवा समिती उपाध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रिया कुडची, सुरज कणबरकर, अजित कोकणे, वासू सामजी, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments