Vijayapura

पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना व्हावी!

Share

गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठही सजू लागली आहे. श्री गणेशाच्या सजावटीसाठी नानाविध प्रकारच्या आरास आणि इतर सजावटीच्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. कोविडचे घोंगट यंदा दूर झाले असून प्रशासनानेही भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान शेडू- माती आणि पीओपी पासून बनविण्यात येणाऱ्या श्रीमूर्तींसंदर्भात अद्यापही संभ्रम आहे. पर्यावरण प्रेमींनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, असा आग्रह हिंदू नेत्यांकडे केला आहे.

कोविड पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात साधेपणात श्री गणेशोत्सव साजरा झाला. यंदा कोरोनाचे सावट दूर झाले असून प्रशासनानेही यंदाच्या श्री गणेशोत्सवासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. सुरुवातील काही निर्बंध प्रशासनाने लादले होते मात्र गणेशभक्तांच्या रोषानंतर हे निर्बंध देखील मागे घेण्यात आले आहेत. यंदाचा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली असून विजापूरमधील माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी श्री गणेशभक्तांना यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पीओपी आणि शेडूच्या गणेश मूर्तींबाबत प्रशासन आणि भक्तांमध्ये नेहमीच संभ्रमाचे वातावरण असते. पीओपी मूर्तींवर दरवर्षी प्रशासनाकडून बंदी घातली जाते. यासंदर्भातील आदेश जाहीर केले जातात. मात्र मातीपासून किंवा शेडूपासून बनविण्यात येणाऱ्या श्रीमूर्ती या मोठ्या आकारात मिळणे अशक्य आहे. शिवाय मोठ्या आकारांच्या पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणालाही फटका बसतो. यंदा श्री गणेश भक्तांनी हि बाब लक्षात घेऊन पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत. निसर्गाचा वाढता ऱ्हास आणि याचा मानवी जीवनावर होणार परिणाम, श्री गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनानंतर होणारी जलस्रोतांची हानी याचा विचार श्री गणेश भक्तांनी नक्कीच करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि हिंदू नेते डॉ. बाबुराजेंद्र नाईक यांनी गणेशभक्तांना केले आहे. प्रत्येक वर्षी गणेशभक्तांमध्ये हा संभ्रम असतोच. प्रत्येकवर्षी प्रशासन आणि गणेशभक्तांमध्ये यावरून एकमेकांवर रोष व्यक्त केला जातो. मात्र यंदाचा गणेशोत्सव गणेशभक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक असा साजरा करावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

Tags:

ecofriendlyganesh ganeshchaturti ganeshfestival