बेळगावच्या गोल्फ क्लबजवळ आज बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोल्फ क्लब परिसरात पिंजरा लावला आहे.
दोनच दिवसांपूर्वी बेळगावातील जाधव नगर येथे बिबट्याने एका बांधकाम मजुरावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान, वनविभागाचे कर्मचारी आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. या संदर्भात बिबट्याला पकडण्यासाठी गदग जिल्ह्यातून तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते.

जाधवनगरात आढळलेल्या बिबट्याचा शोध मात्र आज तिसऱ्या दिवशीही लागलेला आहे. वनविभाग आणि पोलिसांची शोधमोहीम सुरूच आहे. तशातच आज पुन्हा शहरातील क्लब रोडवरील गोल्फ क्लबजवळ बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या माहितीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोल्फ क्लबजवळील परिसरात पिंजरा उभारला आहे. कुत्र्याला पिंजऱ्यात टाकून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे स्थानिक नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.


Recent Comments