Belagavi

फॅमिली पेन्शन वाढविण्याच्या मागणीसाठी निवृत्त विमा कर्मचाऱ्यांची निदर्शने

Share

विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये त्वरित वाढ करण्याच्या मागणीसाठी निवृत्त विमा कर्मचारी त्यांच्या वारसांनी बेळगावात आज निदर्शने केली. यावेळी एलआयसी अध्यक्षांच्या नावाचे मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बँकिंग आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये त्वरित वाढ करण्याचा निर्णय २०१९मध्येच घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक आणि बँकिंग क्षेत्रात या निर्णयाची अमलबजावणी याआधीच सुरु झाली आहे. याबाबत एलआयसी बोर्डाने आणि जिपसा बोर्डाने सरकारला अनेकवेळा कळविले देखील आहे. मात्र अजूनही वाढीव फॅमिली पेन्शन देण्यात येत नाही. याच्या निषेधार्थ आणि त्वरित वाढीव पेंशन देण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. गोवावेस येथील एलआयसीच्या विभागीय कार्यालयासमोर निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी घोषणा देत निदर्शने केली. यावेळी बोलताना निवृत्त एलआयसी कर्मचारी संघटनेचे नेते जी. व्ही. कुलकर्णी म्हणाले, निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ ते ६ हजार फॅमिली पेन्शन देण्यात येत. त्यांचा आरोग्य-वैद्यकीय खर्चच १५ ते २० हजारांच्या घरात आहे. इतक्या तटपुंज्या रकमेत त्यांना कुटुंबाचा निर्वाह आणि आरोग्याचा खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे एलआयसी बोर्डाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना वाढीव पेन्शन सरकारने द्यावी अशी मागणी केली.

यावेळी एस. एस. धडेद आणि के. सी. नागराज यांनीही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. निदर्शनानंतर निवर्तु विमा कर्मचाऱ्यांनी एलआयसीच्या मॅनेजर गायत्री आणि डिव्हिजनल मॅनेजर राघवेंद्र इनामदार याना मागण्यांचे निवेदन सादर केले. ते स्वीकारून वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन राघवेंद्र इनामदार यांनी दिले.

या निदर्शनात एस. एम. कुलकर्णी, एस. आर. पाटील, के. एन. अपर्णा, एस. डी. अगसर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव विभागातील बेळगाव, चिकोडी, जमखंडी येथील १२५ निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यात ५० निवृत्त महिला कर्मचारी, ८० वर्षांवरील ६ तर ९१ वर्षांच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश होता.

अशाचप्रकारे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अमर प्लाझा, गोवावेस येथील कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली.

Tags: